यंदा देशभरात मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. बहुतांश घरात लक्ष्मी पूजनाच्या वेळी नवीन झाडूची पूजा करण्याची प्रथा आहे.
झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. पण लक्ष्मीपूजनानंतर जुन्या झाडूचे काय करायचे, असा प्रश्न आपल्याला कायम पडतो. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
लक्ष्मीपूजन झाल्यानंतर जुन्या झाडूची विल्हेवाट लावणे शुभ मानले जाते. जुन्या झाडूची विल्हेवाट लावण्यासाठी होलिका दहन, शनिवार किंवा दिवाळीच्या मुख्य पूजेनंतरचा दिवस उत्तम मानला जातो.
जुना झाडू घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे येतात. म्हणून नवीन झाडू वापरण्यापूर्वी जुन्या झाडूची योग्य विल्हेवाट लावणे महत्त्वाचे असते. घरात एका वेळी दोन झाडू एकत्र ठेवणे टाळावे. तुटलेला किंवा जीर्ण झालेला झाडू घरात ठेवू नये, कारण तो नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो.
जर तुम्हाला जुना झाडू फेकायचा असेल तर तो गुरुवार, शुक्रवार किंवा एकादशी या दिवशी चुकूनही फेकू नये. यामुळे तुम्ही असे केल्यास देवी लक्ष्मीचा रोष ओढवू शकतो.
जुना झाडू घराबाहेर काढल्याशिवाय नवीन झाडूचा वापर सुरू करू नये, कारण जुना झाडू नवीन ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणतो असे मानले जाते. नवीन झाडूचा वापर सुरू करताना तो घरातल्या घरात थोडा फिरवून घ्यावा, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा खेळती राहते.
झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक असते, त्याला कधीही लाथ मारू नये. त्यावर पाय ठेवू नये किंवा तो अनादराने फेकू नये. जुना झाडू बदलताना तो स्वच्छ करून, आदरपूर्वक घरापासून दूर, शक्यतो दक्षिणेकडील दिशेला किंवा एखाद्या झाडाखाली ठेवावा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)