Mumbai Air Pollution : सगळीकडे नुसता फटाक्यांचा धूर, मुंबईच्या हवेची स्थिती काय?
Tv9 Marathi October 23, 2025 10:45 AM

दिवाळी सणाच्या तीन-चार दिवसात दरवर्षी देशभरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी होते. खासकरुन महानगरांमध्ये दिवाळीला फटाके फोडण्याच प्रमाण जास्त आहे. या फटाक्यांमुळे दरवर्षी दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. मुंबई शहरही याला अपवाद नाहीय. मुंबईत मोकळ्या मैदानात, गल्लीबोळात दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. त्यामुळे मोकळ्या जागा, गल्लीबोळात सकाळच्या वेळी फटाक्यांचा कचरा दिसतोय. पण त्याचवेळी प्रदूषणाचा स्तर देखील वाढला आहे.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मंगळवारी मुंबईत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली, ज्याचा थेट परिणाम शहराच्या हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. मंगळवारी मुंबईचा हवा निर्देशांक तब्बल 211 इतका नोंदवला गेला आहे. हा हवा निर्देशांक वाईट श्रेणीत मोडतो. फटाक्यांमुळे रात्रीच्यावेळेत हवेत सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सकाळी वातावरण धुरकट दिसते आहे. कुलाबा, अंधेरी, बांद्रा, गोरेगाव आणि मुलुंड या भागांत प्रदूषणाचा स्तर सर्वाधिक नोंदवला गेला आहे. म्हणजे या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी होण्याचं प्रमाण जास्त आहे.

पुढचे काही दिवस मुंबईत प्रदूषण कसं राहिलं?

फटाक्यांच्या धुरामुळे हवेत कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढते, त्यामुळे ज्यांना श्वसनाचा आजार आहे, त्या नागरिकांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते, असं पर्यावरण तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे अशा नागरिकांनी गरज नसताना बाहेर जाणं टाळलं पाहिजे. त्या नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. मुंबई महानगर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषणाच्या वाढत्या स्तरावर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. पुढील काही दिवस वाऱ्याचा वेग कमी असल्याने प्रदूषणाची पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होतं आहे.

अॅपच्या माध्यमातून हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण

मुंबई शहरासह उपनगरांमध्ये वातावरणावर फटाक्यांचा परिणाम झाल्याची अॅपवर नोंद झाली आहे.अॅपच्या माध्यमातून देशभरातील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यात येते. मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ ते ‘वाईट’ या स्तरावर होती. दुपारनंतर त्यात आणखी बदल होऊन हवा गुणवत्ता ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली गेली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच फटाके फोडण्यात येत होते. सायंकाळी 6 वाजल्यानंतर पुन्हा फटाके फोडण्यास सुरुवात झाली. सुतळी बॉम्ब, पाऊस, आकाशात फुटणारे रंगीबेरंगी फटाके यामुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.