Tivsa News : परंपरागत गाई-म्हशीच्या खेळाला गालबोट, दगडफेक आणि रोषाचे वातावरण; तिवसा येथे पोलिसांचा बळाचा वापर
esakal October 23, 2025 04:45 PM

तिवसा : शहरात अनेक वर्षांपासून जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर मकाजी बुवाची मूर्ती आहे. याठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने गाई-म्हशींचा परंपरागत खेळ भरविल्या जातो. मात्र यावर्षी याठिकाणी पोलिसांनी नागरिकांवर बळाचा वापर केल्यामुळे या खेळाला गालबोट लागले. नागरिकांनी पोलिसांच्या वाहनावर फटाके फेकले तसेच दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला.

शहरातील मुख्य बाजारपेठ व जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या वडाच्या झाडाखाली मकाजी बुवा यांची पूजा करून शहरातील पशुपालक शेतकरी आपल्या गाई-म्हशींची ओवाळणी करून खेळवतात व दिवाळी साजरी करतात. संपूर्ण बाजारपेठ आज (ता. २२) दुपारी दोन वाजता बंद करण्यात आली व सुमारे चार वाजेपासून या परंपरागत खेळाला सुरवात झाली. मात्र, खेळ सुरू असताना किरकोळ भांडण झाले व त्यानंतर फटाके फोडण्यावरून वाद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करताच काहींनी पोलिसांच्या वाहनांवर फटाके व दगड फेकले.

Pune Crime : पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेसह तिघांचे दागिने लंपास

तिवसा पोलिसांनी एका दिवसापूर्वीच समाजमाध्यमांवर गाई-म्हशी खेळण्याच्या दरम्यान शांतता राखण्याचे आवाहन केले होते. मात्र पोलिसांनी बळाचा वापर केल्याने नागरिकांचा संताप पाहायला मिळाला. काही तरुणांनी पोलिस लाठीचार्ज करीत असतानाची चित्रफीत केली असता पोलसांनी मोबाईल हिसकावून व्हिडिओ डिलिट केल्याचे सांगण्यात येते.

दरवर्षी परंपरागत गाई -म्हशीचा खेळ भरवीला जातो. मुख्य बाजारपेठेतील काही नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही याठिकाणी बंदोबस्त लावला होता. परंतु याठिकाणी वाहनावर तसेच अंगावर फटाके फोडल्याचा प्रकार घडल्यामुळे आम्हांला लाठीचार्ज करावा लागला. घटनास्थळी परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही यावेळी उपाययोजना केल्या.

गोपाल उपाध्याय, ठाणेदार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.