राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’वर पोहोचले आहेत. गेल्या काही महिन्यांमधील ही दोन्ही ठाकरे बंधूंची 9 वी भेट आहे. उद्धव ठाकरे हे चौथ्यांदा ‘शिवतीर्थ’वर पोहोचले आहेत. राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर दाखल झाले आहेत.
दरम्यान सध्या दिवाळी सण सुरू आहे, दिवाळीमुळे शिवाजी पार्क आणि आसपासच्या परिसरात प्रचंड ट्राफिक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे वाहतूक कोंडीतून वाट काढत मागच्या दरवाजानं शिवतीर्थवर पोहोचले आहेत. राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांचा आज वाढदिवस असल्यानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर पोहोचले आहेत. ही एक कौटुंबीक भेट आहे.
दरम्यान राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर वरळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू कित्येक वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले होते, त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते, त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काही दिवसांनी उद्धव ठाकरे देखील शिवतीर्थवर पोहोचले, ही राजकीय भेट होती, उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अनिल परब हे देखील होते. दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये यावेळी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर आली.
दरम्यान त्यानंतर राज ठाकरे यांनी सहकुटूंब उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीला भेट दिली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. आज राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.