Mythological Story About Bhaubeej: आज भाऊबीज; दिवाळीतील सर्वात शेवटचा सण आणि बहिण-भावाच्या निरागस नात्याचा उत्सव साजरा करणारा दिवस. या दिवशी बहिण भावाचे औक्षण करते. तसेच बहिण-भाऊ दोघेही एकमेकामांच्या सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. गोडा-धोडाचे, पंचपक्वान्नाचे जेवण बनवले जाते. मात्र आपण भाऊबीज का साजरी करतो तुम्हाला माहित आहे का? यामागे एक पौराणिक कथा आहे. ज्यामुळे भाऊबीजेला यमद्वितीयाही म्हणतात.
स्कंद पुराणात भाऊबीजेबद्दल एक सुंदर कथा सांगितली आहे, ती म्हणजे मृत्यूचा देवता यम आणि जीवन देणारी नदी यमुना या दोघा भावंडांची.
छाया, जी भगवान सूर्य नारायण यांची पत्नी होती, तिला आणि सूर्याला दोन अपत्य होते — मुलाचे नाव यम आणि मुलगी यमुना. यमुनेचे लग्न झाल्यानंतर यम आपल्या बहिणीला सासरी भेटायला फार कमी जात असे. त्याला माहीत होते की तो मृत्यूचा देव आहे, त्यामुळे आपल्या बहिणीच्या संसारावर त्याची काळी सावली पडू नये, आणि तिच्यावर कोणतेही संकट येऊ नये. म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यासाठी टाळाटाळ करत असे.
यमुनेच्या सासरचे लोकही यमाला त्यांच्या घरी येणे पसंत करत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती.
एकदा यमुनेने यमाला आपल्या घरी येण्यासाठी खूप कळकळीची विनंती केली आणि शेवटी यमाला बहिणीला भेटायला जावेच लागले. यम बहिणीच्या घरी पोहोचल्यावर यमुनेने त्याचे अगदी प्रेमाने आदरातिथ्य केले, त्याला पाटावर बसवून ओवाळले.
यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार आणि इतर अनेक भेटवस्तू दिल्या आणि विचारले, “यमुने, तुला अजून काय हवे आहे माझ्याकडून?”
तेव्हा बहिणीने भावाला सांगितले की, “तू दरवर्षी या दिवशी इथे येशील, आणि जी बहीण आपल्या भावासाठी जेवण करील आणि टिळा करेल, तिला कधीही कोणताही भय जाणवू नये.”