पोलिस स्मृतीदिनी मनोर पोलिसांकडून शहिदांना मानवंदना
esakal October 24, 2025 08:45 AM

मनोर, ता. २३ (बातमीदार) : पोलिस स्मृतिदिनी मनोर पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हद्दीतील कुडे गावच्या सातवीपाडा येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहीद पोलिस आणि सैनिकांच्या हौतात्म्याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये संवेदनशीलता, तसेच शहिदांच्या कुटुंबीयांबद्दल आत्मीयता निर्माण करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

पालघर जिल्हा पोलिस दलाच्या पालघर कनेक्ट उपक्रमाअंतर्गत सुरक्षा, संवाद आणि सेवा या उपक्रमाअंतर्गत विविध सेवांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. महिला सुरक्षा, सीईआयआर पोर्टलवर हरवलेले अथवा चोरीस गेलेल्या मोबाईलची तक्रार, आपले सरकार पोर्टलवरील स्पीकर परवाना, सभा मिरवणुकांच्या परवानग्या, समुद्र संदेश व सागरी सुरक्षा, डायल-१०९३, ऑनलाइन फसवणूक आणि दक्षता, आंतरराष्ट्रीय मदत क्रमांक १९३० व १९४५ ची माहिती, व्हाॅट्सॲप आधारित अर्ज ट्रॅकिंग प्रणाली, जिल्हा पोलिस संकेतस्थळ, भाडेकरूची ऑनलाइन माहिती भरणे, सिटीझन पोर्टल, महिला हेल्पलाईन क्रमांक ८६६९६०९५४४ आणि व्हाॅट्सॲप मदत क्रमांक ९७३०७११११९, तसेच डायल ११२ संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी मनोर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणवीर बयेस, कुणबी युवक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत सातवी, पोलिस पाटील तुषार सातवी, ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील आवंढाणी गावात आयोजित कार्यक्रमात मनोर पोलिसांकडून निवृत्त कर्मचारी त्रिंबक मातेरा, पांडुरंग गोवारी, यशवंत गोवारी, दिवंगत तुकाराम मोर यांच्या पत्नी ताराबाई मोर आणि रत्नाकर वरखंडे, तसेच राज्य राखीव पोलिस दलात निवड झालेले अवंढाणी गावातील जयवंत मातेरा यांचा सत्कार करण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.