भाऊबीजेच्या मुहूर्तावर कोंडीविघ्न
पर्यटकांसह स्थानिकांमुळे अलिबाग पोलिसांची दमछाक
अलिबाग, ता. २३ (वार्ताहर)ः दिवाळीच्या धामधुमीत शहरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यात सुट्टीचे दिवस असल्याने पर्यटकही दाखल झाले आहेत. गुरुवारीही भाऊबीजेसाठी मोठ्या संख्येने बहीण-भाऊ एकमेकांकडे निघाल्याने अलिबाग-वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
सध्या दिवाळीची धामधूम आणि सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू आहे. हल्ली पर्यटकही खासगी वाहनाने येत असल्याने आणखी भर पडत आहे. गुरुवारी (ता. २३) भावा-बहिणीचे नाते घट्ट करणारा भाऊबीजेचा सण असल्याने रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. अनेकांना सुट्टी नसल्याने काही जणांनी सकाळच्या वेळेत, तर अनेकांनी सायंकाळी भाऊबीज साजरी केली. या वेळेत अलिबाग-वडखळ रस्त्यावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. पोयनाड, पेझारी नाका, शहरात बायपास रोड, एसटी स्टॅंड परिसर यासह महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात होते, मात्र पर्यटकांसह स्थानिकांचीही वर्दळ वाढल्याने दमछाक उडाली.
़ः------------------------------
संथ वाहतूक
अलिबाग-वडखळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगण्यात आले. खड्डे चुकवताना दुचाकीसह चारचाकी चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा आंदोलने, मोर्चे काढूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
----------------------------------
वडखळ-अलिबागसाठी दीड तास
पर्यटकांच्या आगमनामुळे वाहतूक कोंडी
पोयनाड, ता. २३ (बातमीदार): भाऊबीजेनिमित्त लाडक्या बहिणींना भेटायला जाणाऱ्या लाडक्या भावांच्या प्रवासात गुरुवारी वाहतूक कोंडीचे विघ्न दिसून आले. पेण-अलिबाग राज्यमार्गावर पांडवादेवी ते पेझारी, धरमतर ते शहाबाज यादरम्यान प्रामुख्याने वाहतूक कोंडी दिसून आली.
दिवाळी सुट्टीनिमित्त पर्यटक आल्याने वडखळ-अलिबाग अर्धा ते पाऊण तासात अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तासांचा अवधी लागत होता. पोयनाड परिसरातील अंतर्गत रस्ते वाहनांनी भरून गेले होते. स्थानिक नागरिकांना या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. पुणे, मुंबईवरून आलेल्या काही पर्यटकांनी पांडवादेवी-भाकरवड-देहेन-श्रीगाव-नवेनगर फाटा-बांधण-पेझारी चेक पोस्ट अशी चारचाकी वाहने वळवल्याने अंतर्गत रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी दिसून आली. राज्यमार्गावरून जाण्याऐवजी काही पर्यटक अंतर्गत रस्त्यावरून गेल्याने तेथे काही काळ वाहतूक कोंडी झाल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच एसटी महामंडळाच्या बसलादेखील प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळच्या सुमारास पोयनाड-पेझारी परिसरात पनवेल, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी दिसून आली.
-----------------------------
एसटी प्रवाशांना फटका
भाऊबीजेच्या दिवशी पेण-अलिबाग राज्यमार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीचा एसटी प्रवाशांना मोठा फटका बसला. एसटी प्रवासाला नेहमीच्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने मुंबई, पुणे, पनवेल, ठाणे येथे प्रवास करत असलेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.