न्यूझीलंडविरुद्धचा महत्त्वाचा सामना भारताने 53 धावांनी जिंकला आणि उपांत्य फेरीत जागा पक्की केली. पावसामुळे या सामन्यात व्यत्यय आला आणि भारताने 49 षटकं खेळत 3 गडी गमवून 340 धावा केल्या. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार टार्गेट निश्चित करण्यात आलं आहे. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 44 षटकात 325 धावांचं आव्हान दिलं गेलं. न्यूझीलंडने 44 षटकात 8 गडी गमवून 271 धावा केल्या. भारताने हा सामना 53 धावांनी जिंकला असला तर न्यूझीलंडने कडवी झुंज दिली. न्यूझीलंडने आक्रमक खेळ दाखवत भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. जर हा सामना 50 षटकांचा असता तर कदाचित न्यूझीलंडची रणनिती प्रभावी ठरली असती असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण भारताची गोलंदाजी या स्पर्धेत काही प्रभावी ठरलेली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 331 धावा करूनही भारताने हा सामना 49 षटकातच गमावला होता. त्यामुळे भारताची सुमार गोलंदाजी पाहून कर्णधार हरमनप्रीत कौरची चिंता वाढली आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौर सामन्यानंतर म्हणाली की, ‘मला वाटते की आम्ही फलंदाजी करताना खूप चांगले करत आहोत. पण गोलंदाजी ही अशी गोष्ट आहे जी मला वैयक्तिकरित्या वाटते की आम्हाला स्वतःला खरोखर मजबूत ठेवावे लागेल. आमच्याकडे आणखी एक सामना आहे जिथे आम्ही ती गोष्ट देखील पार करू शकतो. आशा आहे की, गोलंदाजी युनिट म्हणून देखील, आम्ही एकत्र येऊन एक चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करू.’ हरमनप्रीत कौरची चिंता योग्यच आहे. कारण फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर गोलंदाजांना त्या धावा रोखता येणं आवश्यक आहे. अन्यथा जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करणं कठीण आहे.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा शेवटचा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजीकडे लक्ष असणार आहे. गोलंदाजांना त्याच्या रणनितीत सुधारणा करण्याची ही शेवटची वेळ असणार आहे. कारण उपांत्य आणि अंतिम सामन्यात अशी चूक करणं परवडणारं नाही. उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. या दोन्ही संघांचा साखळी फेरीत शेवटचा सामना 25 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघासोबत भारताची उपात्य फेरीत लढत होणार आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे.