टीम इंडियाचा स्टार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत आतापर्यंत सुपर फ्लॉप ठरला आहे. रोहित शर्मा आणि विराट या दोघांनी ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कमबॅक केलं. तब्बल 7 महिन्यांनी दोघांचं कमबॅक होणार असल्याने चाहते आनंदी होते. रोहित-विराटकडून चाहत्यांना खणखणीत खेळीची अपेक्षा होती. या जोडीने पर्थमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात निराशा केली. रोहित 8 धावांवर बाद झाला. तर विराटला भोपळाही फोडता आला नाही.
रोहित-विराट पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्याने ते दुसऱ्या सामन्यातून कमबॅक करतील असा विश्वास होता. रोहितने चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरवत महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र विराट सलग दुसऱ्या सामन्यातही भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. विराटची एकदिवसीय कारकीर्दीत सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. या प्रकारामुळे विराटच्या कारकीर्दीला एकाप्रकारे डागच लागला. अशात आता विराटचा या दुसऱ्या सामन्यातील एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
हा व्हायरल व्हीडिओ ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग दरम्यानचा अर्थात दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावातील आहे. विराट या व्हीडिओत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेड याला काहीतरी बोलताना दिसतो. त्यानंतर काही मिनिटांनी ट्रेव्हिस हेड आऊट होतो.
ऑस्ट्रेलियाने 265 धावांचा पाठलाग करताना कॅप्टन मिचेल मार्श याच्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यांनतर ट्रेव्हिस हेड सांभाळून खेळत होता. विराटने 13 व्या ओव्हरआधी हेडच्या खांद्यावर हात ठेवत काही सेकंद गप्पा मारल्या. त्यानंतर विराट कोहली फिल्डिंगसाठी निघून गेला. तेव्हा हेड 39 बॉलमध्ये 28 रन्स करुन खेळत होता.
त्यानंतर हर्षित राणा ऑस्ट्रेलियाच्या डावातील 13 वी ओव्हर टाकायला आला. हर्षितने टाकलेल्या दुसऱ्या बॉलवर हेडने फटका मारला. मात्र हर्षितने टाकलेला बॉल हेडच्या बॉलवर अचूक बसला नाही. त्यामुळे हेडच्या बॅटला लागून बॉल हवेत गेला. विराटने कोणतीही चूक न करता कॅच घेतला आणि हेड आऊट झाला. हेडने या सामन्यात 40 बॉलमध्ये 28 रन्स केल्या. हेड आऊट झाल्यानंतर आता विराटने त्याला नक्की काय म्हटलं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विराटच्या बोलण्यामुळे हेडचं बॅटिंगवरुन लक्ष विचलित झालं आणि त्यातून तो आऊट झाला, असंही म्हटलं जात आहे.
विराट-हेडचा व्हायरल व्हीडिओ
दरम्यान ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यासह मालिकाही आपल्या नावावर केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला एडलेडमध्ये विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं.