कल्याण फाटा ते कळंबोली महामार्ग आठपदरी करा
esakal October 24, 2025 08:45 PM

कल्याण फाटा ते कळंबोली महामार्ग आठपदरी करा
माजी आमदार भोईर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कल्याण फाटा ते कळंबोली या महत्त्वाच्या पट्ट्यात अवजड वाहतुकीमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून, सध्याचा चार पदरी महामार्ग आठ पदरी करण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

उरण येथील जे.एन.पी.टी. बंदरातून दररोज सुमारे २० ते २५ हजार कंटेनर आणि अवजड वाहने नाशिक, गुजरातसह इतर राज्यांमध्ये याच मार्गाने येत-जात असतात. त्यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. तसेच, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाल्यामुळे भविष्यात या महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा हा महामार्ग (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील) सध्या अपुरा पडत आहे. या मार्गावर अवजड वाहन बंद पडल्यास किंवा अपघात झाल्यास वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे चार पदरी महामार्ग आठ पदरी केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे भोईर यांनी पत्रात नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
माजी आमदार भोईर यांनी केलेल्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली असून, यासंबंधी तातडीने आठ पदरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.