स्पर्धेच्या युगात मानवामुळेच धर्मांमध्ये स्पर्धा
esakal October 24, 2025 08:45 AM

विरार, ता. २३ (बातमीदार) : धर्म एकमेकांच्या विरोधात नाहीत, मात्र स्पर्धेच्या युगात राहात असल्यामुळे आपण धर्माधर्मांत स्पर्धा लावलेली आहे. खऱ्या श्रद्धावंतांनी धर्माधर्मांत एकोपा जपण्याचे कार्य करावे. भारतीय ख्रिस्ती जनतेला स्थानिक संस्कृतीच्या निमित्ताने वैश्विक विचारांचा वारसादेखील मिळाला. हे सर्व संचित फादर पिठेकर यांनी आपल्या पुस्तकात एकत्रित केले आहे, असे प्रतिपादन आर्चबिशप डॉ. फेलिक्स मचाडो यांनी केले. ते फादर ज्यो पिठेकर यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

ज्येष्ठ लेखक फादर ज्यो पिठेकर यांच्या ‘शोध अनाम देवाचा, निर्विचार व निविकाराच्या दिशेने’ या पुस्तकाचे प्रकाशन माणिकपूर येथील लोयोला सभागृहात सुजाता मिनिजेस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्चबिशप डॉ. फेलिक्स मचाडो होते. कवी सायमन मार्टिन आपल्या भाषणात म्हणाले की, ख्रिस्ती तत्त्वज्ञान व भारतीय दर्शनांचा संगम फादर पिठेकर यांच्या विचारात झालेला आहे. मानवधर्माची पताका खांद्यावर घेऊन निघालेले ते वारकरी आहेत. आजच्या अस्वस्थ जगात शांती आणि उन्नतीचा अनुभव केवळ योग मार्गानेच येऊ शकतो. एक धर्म जेव्हा दुसऱ्या धर्माचा वैरी होतो, तेव्हा माणुसकीची हत्या होते. म्हणून या पुढे आपण केवळ धार्मिक असून, चालणार नाही, तर बहुधार्मिक असणे गरजेचे आहे. खरा धार्मिक कधीही अन्य धर्माचा द्वेष करणार नाही. फादर पिठेकर यांनी स्नेह आणि सौहार्दांचा मंत्र या ग्रंथातून दिलेला असून, हे पुस्तक म्हणजे एका संन्याशाचे आत्मचरित्रच आहे.

फादर मायकल यांनी आपल्या भाषणात या पुस्तकातील सौंदर्यस्थळांचा सांगोपांग धांडोळा घेतला. सुनीता मीरांडा यांनी सूत्रसंचालन, तर इंदिरा अल्मेडा यांनी आभार मानले. नटन या नृत्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायत्री मंत्राचे नाट्यरूपांतर सादर केले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ धर्मगुरू बार्थोल मचाडो, मायकल डिसोझा, माजी प्राचार्य डॉमणिक लोपीस, ॲड. अतुल आल्मेडा, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, उद्योजक स्टॅनी मिनेजीस, फादर फ्लॉरेन्स उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.