दक्षिण अफ्रिकेने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत लोळवलं, मालिकेतील हिशेब केला चुकता
Tv9 Marathi October 24, 2025 09:45 AM

दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. या विजयासह मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकला असंच आता निकालानंतर म्हणण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे हा सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकेल असं वाटलं होतं. पण भलतंच घडलं. पाकिस्तानने पहिल्या डावात 333 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा डाव गडगडला. 235 धावांवर 8 विकेट तंबूत होते. मात्र तळाच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना धुतलं. तसेच 404 धावांपर्यंत मजल मारली. यासह पहिल्या डावात 72 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत होता.

पाकिस्तानने दुसऱ्या डावात 138 धावांपर्यंत मजल मारली. त्यातही दक्षिण अफ्रिकेच्या 72 धावा वजा कराव्या लागल्या. त्यामुळे 66 धावा उरल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 67 धावांचं आव्हान मिळालं. दक्षिण अफ्रिकेने हे आव्हान 2 गडी गमवून पूर्ण केलं. यासह दक्षिण अफ्रिकेने पाकिस्तान 8 गडी राखून विजय मिळवला. तसेच मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. या मालिकेतील पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधान शान मसूद म्हणाला की, ‘दुर्दैवाने, आम्ही गोलंदाजीच्या बाबतीत अपयशी ठरलो. आम्ही पहिला डाव योग्यरित्या पूर्ण केला नाही. त्या शेवटच्या दोन विकेट्स आम्हाला महागात पडल्या आणि नंतर त्यामुळे आमच्यावर खूप दबाव वाढला. तुम्ही सामान्यतः पाहिले असेल की पहिल्या डावातील फरक तिसऱ्या आणि चौथ्या डावात जातो.’

दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेचे बिगुल फुंकलं आहे. कारण आता दक्षिण अफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तसेच दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मार्करम म्हणाला की, ‘मालिकेतून तुम्ही जे काही शिकू शकता ते घ्या. अर्थातच, हा विजय चेंज रूमसाठी उत्तम आहे. पण या मालिकेत आपण बरेच धडे शिकलो आहोत आणि आपल्याला ते कायम ठेवावे लागेल. मी म्हटल्याप्रमाणे, अशा परिस्थितीत आपण प्रगतीपथावर आहोत आणि आपण भारताकडे जात आहोत आणि तिथे आपल्याला शिकण्यासाठी आणि योग्यरित्या कसे खेळायचे आणि मोठे प्रदर्शन करायचे आणि ते कुठे संपते ते पाहण्यासाठी बरेच धडे असतील.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.