ओडिशामध्ये यंदा इंडियन रोड काँग्रेस
भुवनेश्वर, ता. २३ ः केंद्रीय महामार्ग आणि रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी इंडियन रोड काँग्रेसच्या ८४व्या वार्षिक सत्राला उपस्थित राहणार आहेत.
७ ते १० नोव्हेंबर या कालावधीत हा कार्यक्रम होत आहे. ओडिशाचे बांधकाममंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
ते म्हणाले, की देशभरातून अभियंते, तांत्रिक तज्ज्ञ आणि इतर भागधारकांसह ३,५०० प्रतिनिधी या वार्षिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. ओडिशा सहाव्यांदा या राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. इंडियन रोड काँग्रेस हे ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि रस्ते बांधकाम, देखभाल आणि वाहतूक पायाभूत सुविधांवर विचारविनिमय करण्यासाठी एक प्रमुख राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून काम करते. यामध्ये नवीन तंत्रज्ञान, उपकरणे, संशोधन, नियोजन, वित्त, कर आकारणी आणि धोरण यांचा समावेश आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.