विशेष गाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वॉर रूमची स्थापना, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी
Tv9 Marathi October 24, 2025 06:45 PM

सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या चालवल्या जातात. त्यामुळे ट्रॅकवर गाड्यांची गर्दी वाढते, परिणामी अनेक गाड्या लेट होतात. अशातच आता प्रवाशांच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वेने रेल भवन येथे वॉर रूमची स्थापना केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वॉर रूमची पाहणी केली आणि वॉर रूमबाबत माहिती दिली. मंत्री याबाबत नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

या वॉर रूमबाबत माहिती देताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, 3 स्तरावर वॉर रूम बनवण्यात आले आहेत. एक वॉररूम डिव्हिजन स्तरावर आहे. दुसरे झोनल स्तरावर आणि तिसरे रेल्वे बोर्ड स्तरावर आहे. रेल्वे बोर्ड स्तरावर डिव्हिजन आणि झोनल स्तरावरीलदेखील फीड येते. तसेच मोठ्या स्टेशनवर एक मिनी कंट्रोल रूम बनवण्यात आले आहे. यामुळे देशातील प्रत्येक स्टेशनची काय परिस्थिती आहे? कुठे जास्त गाड्या आहेत? समस्या काय आहेत? याची माहिती मिळते.

उदाहरण देताना मंत्री म्हणाले की, उधनामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त प्रवासी आले होते. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये आजूबाजूच्या स्टेशनवर पार्क असलेल्या गाड्या उधनाच्या दिशेने पाठवण्यात आल्या. यामुळे काही तासांमध्ये सर्व प्रवाशांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. इतर काही स्टेशनवरही अतिरिक्त गाड्या पाठवण्यात आल्या. हे सर्व वॉर रूममुळे शक्य झाले. तसेच अचानक प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणूनही उपाययोजना केल्या असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.

पुढे बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, या वॉर रूममुळे कोणत्या वेटिंग एरियामध्ये किती प्रवासी आहेत याचीही माहिती मिळते. त्यामुळे अशा ठिकाणी अतिरिक्त गाड्या पाठवणे सोपे होते. यावेळी तब्बल 10 हजार 700 अतिरिक्त गाड्या चालवण्याची योजना होती. यातील काही गाड्यांची माहिती IRCTC च्या वेबसाईटवर देण्यात आली होती. तसेच 3000 गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. 13 हजारांपेक्षा जास्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते.

ज्या स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये जागा कमी पडत होती त्या ठिकाणी काही तासांमध्ये जागा वाढवण्यात आली आहे. याचा प्रवाशांना फायदा झाला. यावेळी मंत्र्यांनी देशातील विविध स्टेशनवरील सद्यस्थितीही दाखवली. ज्या ठिकाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे तिथे त्वरित उपाययोजना केल्या जातात अशी माहितीही वैष्णव यांनी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.