18 तास काम, फक्त एक वेळेस जेवण, नंतर स्मशानभूमीतील रात्र; त्या 7 मुलांसोबत भयंकर घडलं…
Tv9 Marathi October 24, 2025 06:45 PM

राजस्थानची राजधानी जयपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील एका स्मशानभूमीत 7 मुळे घाबरलेल्या अवस्थेत आढळली आहेत. या मुलांनी संपूर्ण रात्र स्मशानात काढली. मात्र ही मुले कोण आहेत? ही मुले स्मशानात कशी आली? असा जयपूर पोलीसांना पडला होता. सुरुवातीला ही मुळे भीतीमुळे बोलत नव्हती, मात्र काही वेळानंतर सत्य समोर आल्यानंतर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या मुलांसोबत नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही सर्व 7 मुले बिहारमधील आहेत. दोन महिन्यांपूर्वी शमशाद मियां या व्यक्तीने या मुलांना पर्यटनाच्या नावाखाली राजस्थानमधील जयपूरमध्ये आणले. मात्र जयपूरमध्ये आल्यानंतर या मुलांचे आयुष्यात अंधार पसरला. कारण या सर्व मुलांना जयपूरमधील बांगड्या बनवण्याच्या कारखान्यात कामासाठी नेण्यात आले. कारखान्यात या मुलांकडून 15ते 18 तास काम करून घेण्यात येत होते. काचेच्या बांगड्या बनवताना ही मुले जखमी होत असतं, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असे. या काळात त्यांना दिवसातून फक्त एक जेवण दिले जायचे. तसेच एखाद्या मुलाने काम करण्यास नकार दिला तर त्याला काठ्यांनी मारहाण केली जात असे. त्यामुळे ही सर्व मुले चिंतेत होती.

मुलांनी स्मशानात काढली रात्र

कारखान्यातील कामामुळे ही मुळे संकटात सापडली होती. दिवालीच्या दिवशी या मुलांनी कारखान्यातून पळून जायचे ठरवले. दिवाळीच्या दिवशी ही मुले कारखान्यातून बाहेर पळाले आणि भटकत-भटकत भट्टा बस्ती येथील एका स्मशानभूमीत पोहोचले. या मुलांनी संपूर्ण रात्र स्मशानात घालवली. सकाळी स्थानिक लोकांना ही मुले दिसली तेव्हा त्यांनी याबाबत पोलीसांनी माहिती दिली. पोलीसांनी तातडीने स्मशानात पोहोचत या मुलांची विचारपूस केली. मात्र भीतीमुळे ही मुले सुरुवातीला काहीच बोलत नव्हती. मात्र काही काळानंतर त्यांनी पोलीसांना सत्य परिस्थिती सांगितली. त्यानंतर पोलीसांनी आरोपीचा शोध सुरू केला.

आरोपी पोलीसांच्या ताब्यात

पोलीसांनी तपासाची सुत्रे फिरवत शमशाद मियाँ या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीची चौकशी केली असता असे आढळले की, जयपूरमधील अनेक बांगड्या कारखान्यांमध्ये लहान मुले काम करत आहे. लहान मुलांचे हात लहान आणि नाजूक असतात, ज्यामुळे काच फुटत नाही, त्यामुळे या मुलांना कामावर ठेवण्यात येते अशी माहिती समोर आली आहे. तसेच या मुलांना खूप कमी पैसे दिले जात असल्याचेही समोर आले आहे.

बालकामगार

दरम्यान, जयपूरच्या बांगड्या कारखान्यांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून बालकामगार काम करत आहेत. देशात बालकामगार कायदे असूनही कारवाई होत नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांचे हात लहान आणि नाजूक असल्याने त्यांना हे काम करण्यास भाग पाडले जाते. मात्र हे काम धोकादायक आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.