सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याप्रमाणेच यंदा दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरही वाहन खरेदीला मोठा वेग मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रमी वाहन खरेदीची नोंद झाली आहे. मागील वर्षी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अवघ्या ३७ वाहनांची नोंद झाली होती. यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी १६१ नवीन वाहनांची नोंद झाली आहे, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिली आहे. या १६१ वाहनांमध्ये सर्वाधिक १३६ वाहने दुचाकी प्रकारातील आहेत.
ठाणे शहरात दिवसेंदिवस वाहन पार्किंगची समस्या जटील होत चालली आहे. त्यात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. असे असले तरी, दुसरीकडे ठाणे प्रदेश परिवहन विभागाकडे नवीन वाहन खरेदीच्या नोंदिनी टॉप गियर टाकला आहे. गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, ही प्रत्येकाची इच्छा असते, त्यात वाहन कर्जही आता अधिक सुलभ झाल्यामुळे ते आता शक्य होत आहे. ठाणे शहरात पार्किंगची समस्या आणि इंधनाचे वाढलेले दर असूनही, नवीन वाहन खरेदीच्या नोंदींमध्ये वाढ झाली आहे. वाहन कर्ज सुलभ झाल्यामुळे अनेकांचे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवात चार हजार वाहनांची खरेदी झाली होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर १०५ वाहनांची नोंद झाली होती.
संपूर्ण दिवाळी कालावधीतील नोंदी
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ एका दिवसातच नाही, तर संपूर्ण दिवाळी कालावधीतही वाहन खरेदीत मोठी वाढ झाली आहे. यंदा १३ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत पाच हजार ६८३ नवीन वाहनांच्या नोंदी झाल्या आहेत. मागील वर्षी २१ ते १ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत तीन हजार ७९५ वाहनांची नोंद झाली होती.