पोलिसांच्या तावडीतून बेड्यांसह दोन कैदी पळाले, जळगावात खळबळ
Tv9 Marathi October 24, 2025 07:45 PM

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या तावडीतून बेड्यांसह दोन आरोपी पळाले आहेत. शाकीर शाह अरमान शाह आणि अमजद शेख फकीर कुरेशी असं पोलिसांच्या तावडीतून फरार झालेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्यावर गुरे चोरीचा आरोप होता, या आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे चार ते पाच पोलीस कर्मचारी शासकीय वाहनातून अंमळनेर येथे घेऊन येत होते, याचदरम्यान हा प्रकार घडला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शाकीर शाह अरमान शाह आणि अमजद शेख फकीर कुरेशी हे दोन आरोपी पोलिसांच्या तावडीमधून बेड्यांसह फरार झाले आहेत. त्यांना गुरे चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. गुरे चोरणाऱ्या जळगावच्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचे चार ते पाच कर्मचारी शासकीय वाहनातून अंमळनेर येथे घेऊन जात होते,  यादरम्यान हे  दोन आरोपी बेडयांसह पोलिसांच्या वाहनातून उतरून फरार झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनं जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

चार आरोपीना स्पॉट व्हेरिफिकेशन साठी गुन्हे शाखेचे पोलीस शासकीय वाहनाने अमळनेरला नेत असताना अमळनेर जवळ कुऱ्हे रेल्वे अंडर पास बोगद्यात वाहन आल्यानंतर मागच्या सीटवर बसलेले हे दोघे आरोपी खाली उतरून पळून गेले आहेत. दरम्यान पोलिसांच्या तावडीतून फरार झालेल्या या दोघा आरोपींच्या विरोधात  भारतीय न्याय संहिता कलम २६२ प्रमाणे अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे आरोपींना घेऊन जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

घटनेनं खळबळ 

आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेले आहेत, ते देखील हातामध्ये बेड्या असताना त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, आता या आरोपींचा शोध सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.