नांदेडमध्ये राहणाऱ्या एका 21 वर्षाच्या तरूणाला कर्नाटकमध्ये अतिशय अमानुष पद्धतीने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधांमुळे तरूणाला मारहाण करून, चटके देऊन त्याचा जीव घेतल्याची घटना घडल्याची माहिती मिळत आहे. विष्णूकांत पांचाळ असे मृत तरूणाचे नाव असून तो अवघ्या 21 वर्षांचा होता. त्याचे ज्या महिलेशी प्रेमसंबंध होते, तिच्या नातेवाईकांनी त्याला कर्नाटकला बोलावलं होते. कर्नाटक राज्यातील बिदरच्या नागपल्ली येथे तो गेल्यावर तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात तो गंभीर जखमी झाला, आणि त्याचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला असे समजते. पोलीसांनी कडून या घटनेचा तपास सुरू आहे.
नांदेडच्या तरूणाचे विवाहीत महिलेशी होते प्रेमसंबंध
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णूकांत पांचाळ हा 21 वर्षांचा तरूण नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील गोणेगावचा रहिवासी होती. मात्र त्याचे र्नाटकातील नागमप्पली येथील विवाहित महिलेबरोबर होते, असं सांगितलं जातं. त्या महिलेच्या पतीने तिला सोडून दिलं होतं, त्यानंतर तिची विष्णूकांत याच्याशी ओळख झाली आणि हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र त्या महिलेच्या नातेवाईकांना त्यांचं हे नातं मान्य नव्हतं, त्यांचा यावर राग होता. त्यामुळे 21 ऑक्टोबर रोजी त्या महिलेच्या नातेवाईकांनी, गजानन आणि अशोक या दोघांनी विष्णूकांतला कर्नाटकच्या नागमप्पली येथे बोलावले. तोही प्रेमासाठी गेला पण तिथून परतलाच नाही, प्रेमापायी गेलेल्या त्याला भयाक , वेदनादायक मृत्यू सहन करावा लागला.
हातपाय बांधून मारहाण, चटकेही दिले
त्या दोघांच्या प्रेमकहाणीचं रूपांतर क्रूर हत्याकांडात झालं. विष्णूकांत त्या महिलेच्या गावी गेला खरा, पण तिचे नातेवाईक आणि त्यांच्या इतर काही साथीदार यांचा इरादा वेगळाच होता. विष्णूकांत येताच त्यांनी सर्वांनी मिळून त्याचे हातपाय बाधले आणि त्याच्यावर अमानुष अत्याचार केले. त्याला बेदम मारहाण करण्यात आले. एवढंच नव्हे तर या अत्याचारात विष्णूच्या शरीरावर चटके देण्यात आले, त्याचा अत्यंत निर्दयपणे छळ करण्यात आला.
त्यामुळे तो गंभीर जखमी झाला, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याला उपचारांसाछठी तातडीने हैदराबाद येथील रुग्णालयात हलवलं. मात्र त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. अमानुष क्रूर मारहाण, दिलेले चटके यामुळे तो एवढा गंभीर जखमी झाला होता की 22 ऑक्टोबर रोजी उपचारांदरम्यानच त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याचा तिथेच दुर्दैवी मृत्यू झाला.
या भयानक घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिस नागमप्पली येथे पोहोचले आणि पंचनामा केला आणि गुन्ह्याची नोंद केली. घटनेनंतर फरार असलेले गजानन, अशोक आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.