कासा, ता. २५ (बातमीदार) ः डहाणू परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. शनिवारी (ता. २५) दुपारच्या सुमारास कासा, चारोटी, रानशेत, वधना, ओसर्विरा धनिवरी, सोनाळे परिसरात तब्बल दीड तास जोरदार पाऊस कोसळल्याने शेतांमध्ये पाणी साचले आणि सकाळीच कापलेले भातपीक पाण्यात गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण झाले आहे.
शेतकरी सकाळी लवकर उठून भातकापणी करून पीक वाळविण्यासाठी टाकतात; परंतु दुपारच्या वेळी अचानक मुसळधार पाऊस पडल्याने वाळत घातलेला भात पुन्हा भिजून जात आहे. यावर्षी सुरुवातीला भातपिकाची चांगली वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते; परंतु वारंवार होणाऱ्या वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे कापणीस आलेले पीक मोठ्या प्रमाणात खराब होत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन-चार दिवस अजूनही पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. आम्ही चार महिन्यांपासून खूप मेहनत घेतली. खत-मजुरीवर मोठा खर्च झाला. आता पीक हाती येईल, या आशेवर दिवस काढत होतो; पण हा अवकाळी पाऊस सगळे पाण्यात घालवतो आहे. अशा परिस्थितीत आत्महत्या सोडून दुसरा पर्याय उरत नाही, अशी खिन्न भावना शेतकरी निवास वरठा यांनी व्यक्त केली.