00441
नीती आयोगाची टीम लवकरच सिंधुदुर्गात
नीतेश राणे ः ‘एआय’च्या वापराचा अभ्यास करणार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ ः ‘एआय’ वापरात देशात पहिला जिल्हा ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्राच्या नीती आयोगाची टीम ३० आणि ३१ ऑक्टोबरला भेट देणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही टीम दोन दिवस जिल्ह्यात वास्तव्य करून सिंधुदुर्ग जिल्ह्याने ‘एआय’च्या माध्यमातून साधलेला विकास, यासाठी जिल्ह्याला आलेले अडथळे आणि प्रशासन गतिमान करण्यास केलेली मदत याचा अभ्यास करणार आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांनी ही माहिती दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याने १ मे रोजी ‘एआय’चा वापर प्रशासकीय कारभारात सुरू केला. आरोग्य, शिक्षण, पोलिस, आरटीओ, कृषी आदी पाच विभागांचा कारभार एआयच्या माध्यमातून सुरू केला होता. राज्याने प्रथम याची दखल घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत याचा उल्लेख करीत सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे अन्य जिल्ह्यांत एआयचा वापर करून प्रशासकीय कारभार सुरू करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना राज्याच्या प्रधान सचिवांना दिल्या होत्या. त्यानंतर केंद्रानेही याची दखल घेतली होती. याचवेळी ‘एआय’चा वापर करणारा सिंधुदुर्ग देशातील पहिला जिल्हा ठरला होता. नीती आयोगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘एआय’च्या माध्यमातून सुरू असलेल्या कारभाराचा अभ्यास करण्यासाठी या जिल्ह्याला भेट देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नीती आयोगाने ३० आणि ३१ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार असल्याचे अधिकृत कळविले आहे. त्याची माहिती देण्यासाठी पालकमंत्री राणे यांनी आज जिल्हाधिकारी बैठक सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते.
----
जिल्ह्याचा दोन दिवस होणार अभ्यास!
पालकमंत्री राणे म्हणाले, ‘‘नीती आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि प्रधानमंत्री कार्यालय अंतर्गत काम करत आहे. त्यामुळे नीती आयोग थेट आपल्या कामाचा अहवाल सादर करते. त्यामुळे नीती आयोग अभ्यासासाठी जिल्ह्यात येत आहे, हे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. आयोगाचे तीन वरिष्ठ अधिकारी दोन दिवस जिल्ह्यात राहून अभ्यास करणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात एआयच्या माध्यमातून सुरू असलेला कारभार, झालेला फायदा, नागरिकांना मिळणारे फायदे, प्रशासकीय कारभारात झालेला बदल याबाबत माहिती देणार आहे.’’