जुन्नर, ता. २५ : जुन्नर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयादीत ७०० हून अधिक नावे दुबार असल्याचे आढळून आले आहे. ज्या मतदारांची नावे दुबार म्हणून नोंद आहे, अशी नावे नगर परिषदेच्या कार्यालयातील सूचना फलकावर तसेच वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहेत. मतदारयादीमध्ये दुबार म्हणून नोंद असलेल्या मतदारांनी आपले नाव योग्य त्या प्रभागात राहावे, यासाठी निवडणूक विभागात बाळासाहेब भोसले यांच्याकडे विहित नमुन्यातील फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी केले आहे.
नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभागरचनेपाठोपाठ मतदारयाद्यादेखील सदोष असल्याची इच्छुकांची तक्रार होती. सदोष याद्या दुरुस्त करण्याची मागणी होती. दुबार नावांबरोबर जवळच्या गावातील मतदारांचा समावेश यादीत असल्याने ही नावेदेखील कमी करावीत, अशी मागणी आहे.
मतदारांना त्यांच्या प्रभागातच मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी पालिकेच्या मतदार याद्या दुरुस्त होणे आवश्यक आहे. यामुळे निवडणूक पारदर्शकपणे व नि:ष्पक्षपणे होतील. यासाठी घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत करण्यात याव्यात. यासाठी नगर पालिका प्रशासनास माजी नगरसेवक ॲड. जमीरखान कागदी यांनी नोटीसदेखील बजावली आहे.