Eknath Shinde: घरात बसून काम करणारे मुख्यमंत्री घरी पाठविले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावरही टीका
esakal October 28, 2025 08:45 AM

यवतमाळ : राज्याचा कारभार मुख्यमंत्री घरात बसून करायचे. अशा मुख्यमंत्र्यांना घरी पाठविले आहे. कुणालाही न भेटणारे आता मनोमिलन करीत आहेत. भेटी घेत असून त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना (शिंदे) पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंचे नाव न घेता केली.

ते रविवारी (ता. २६) यवतमाळ येथे शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीव्दारे बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते ज्ञानेश्वर धाने पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. शिंदे म्हणाले, आम्ही डबल ढोलकीवाला नेता पहिला आहे. एकीकडे काँग्रेसची ढोलकी आणि दुसरीकडे हिंदुत्वाची ढोलकी वाजविणारे आता घरी बसले आहेत. सत्तेत होते तेव्हा घरी बसून झोपा काढल्या. आम्ही झोपा काढणारे नसून झोपा उडविणारे असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कुणाचेही नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

म्हणूनच उबाठातून मोठे इन्कमिंग आपल्याकडे सुरू आहे. आता कोणी कोणाशी मनोमीलन केले, भेटी घेतल्या तरी काही होणार नसल्याचेही शिंदे म्हणाले. आता विरोधकांची झोप उडवायची आहे, यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागणे आवश्यक आहे.मित्रपक्षाच्या गोष्टी पटतातच असे नव्हे, मात्र संसार करताना अडचणी होतात. त्या गोष्टीला बाजूला सारून आपल्याला काम करायचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला मित्रपक्षाचा नव्हे तर विरोधकांचा पराभव करायचा असल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde: ‘स्थानिक’मध्ये महायुतीच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमताचा विश्वास एकनाथ शिंदे काय आहे हे दाखवून द्यायचे आहे

एकनाथ शिंदे आणि शिवसेना काय आहे, हे सगळ्यांना दाखवून द्यायचे आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकावयाचा आहे. आपल्याला संघटना मजबूत करणे आहे. येणाऱ्या निवडणूक आपण जिंकणार आहोत. त्यामुळे गाफील राहू नका, महाबिघडीला जोर का झटका धिरेसे नाही तर जोराने द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.