भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'श्री विठ्ठलाचे २४ तास पदस्पर्श दर्शन सुरू'; कार्तिकी यात्रेची तयारी पूर्ण..
esakal October 28, 2025 08:45 AM

पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने रविवारपासून (ता. २६) विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास पदस्पर्श सुरू झाले आहे. दरम्यान आज सकाळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा झाली. त्यानंतर देवाच्या शेज घरातील पलंग काढून विठुरायाला लोड देण्यात आला तर रुक्मिणी मातेला तक्क्या देण्यात आला. ९ नोव्हेंबरपर्यंत (प्रक्षाळ पूजा) देवाचे सर्व राजोपचार बंद राहणार आहेत. कार्तिक यात्रेच्या सोहळ्याची मंदिर समितीने तयारी पूर्ण केल्याची माहिती गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

Solapur News: आकडे पाहून सगळेच म्हणाले, आँ एवढा पाऊस कधी झाला?; मदतीसाठी बहाद्दरांनी पाडला १९९ मि.मी. पाऊस..

२ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी सोहळा संपन्न होणार आहे. यावर्षी किमान पाच ते सहा लाख भाविक येतील असा अंदाज आहे. भाविकांच्या दर्शन रांगेसाठी दहा पत्रा शेड तयार करण्यात आले आहेत. दर्शन रांगेतील भाविकांसाठी पाणी, चहा, नाश्ता मंदिर समिती देणार आहे. आतापासूनच दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत, या भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शनरांग जलद चालविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

परंपरेनुसार श्रींचा पलंग काढल्याने आजपासून भाविकांना २४ तास मुखदर्शन व पदस्पर्शदर्शन घेता येणार आहे. याशिवाय, मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून व जागोजागी एलईडी टिव्हीद्वारे लाईव्ह दर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. संपूर्ण यात्रा कालावधीत भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

पारंपरिक पूजांचे योग्य ते नियोजन करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले. यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतलाताई नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड माधवीताई निगडे , कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा

दोन नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच वाजता कार्तिकी एकादशीची विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. शासकीय महापूजेची मंदिर समितीकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

माेठी बातमी! 'दिलीप मानेंच्या प्रवेशाला तूर्तास ब्रेक'; राजन पाटील, यशवंत माने, शिंदेंचं ठरलं; बुधवारी भाजप प्रवेश.. व्हीआयपी दर्शन बंद

यात्रा काळात आलेल्या भाविकांचे जलद व लवकर पदस्पर्श दर्शन व्हावे यासाठी रविवारपासून मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. यात्रा काळात भाविकांनी मंदिर समितीला सहकार्य करावे, असे आव्हान मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.