Sugarcane Price Protest : ऊस दराची ठिणगी पडली, उसाने भरलेला ट्रॅक्टर अडवला; राजू शेट्टींची संघटना आक्रमक
esakal October 28, 2025 07:45 PM

Kolhapur Raju Shetti : यावर्षीच्या साखर हंगामात उसाला पहिली उचल प्रतिटन ३७५१ रुपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यातून आज जिल्ह्यात ऊस दराची ठिणगी पडली. कागलच्या शाहू कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कणेरीवाडीजवळ रोखून धरला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या ऊस परिषदेत यावर्षी उसाला प्रतिटन ३७५१ रुपये पहिली उचल देण्याची मागणीकेली होती. दुसरीकडे बहुतांशी कारखान्यांनी दसरा व दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उसाची मोळी टाकून हंगामाला सुरुवात केली आहे. काही कारखान्यांचे तोडणीचे नियोजनही जाहीर झाले आहे.

Raju Shetti : राजू शेट्टी करणार साखर कारखानदारांची कोंडी, ‘स्वाभिमानी’ची जयसिंगपुरात ऊस परिषद

त्यातून आज कागलच्या शाहू कारखान्यासाठी ऊस घेऊन चाललेला ट्रॅक्टर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कणेरीवाडीजवळ अडवला. उसाची पहिली उचल संघटनेच्या मागणीनुसार जाहीर होणार नाही तोपर्यंत ऊस तोड करू देणार नाही आणि ऊस वाहतूक करणारी वाहनेही अडवू, असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.

तोडलेला ऊस अडवून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, हा हेतू ठेवून उसाने भरलेला ट्रॅक्टर सोडून दिल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्यांच्यासोबत महावीर नाईक, जयगोंड पाटील, अभय आलासे, युवराज पाटील आदींसह संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.