महाराष्ट्रात पक्ष अदलाबदलीचा गेम सुरु, कोणाच्या गडाला लागला सुरुंग? कोणाची ताकद वाढली?
Tv9 Marathi October 28, 2025 10:45 PM

राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी सत्ताधारी पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचे मोठे सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. विविध पक्षांमधील प्रमुख पदाधिकारी आपापल्या समर्थकांसह अन्य पक्षात प्रवेश करत असल्याने राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. या प्रवेश सत्रामुळे ठाकरे गट, शिंदे सेना आणि काँग्रेसला मोठा फटका बसला असून अजित पवार गट आणि काँग्रेसची ताकद वाढताना दिसत आहे.

महेंद्र थोरवेंचा ठाकरेंना मोठा धक्का

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. महेंद्र थोरवे यांनी नसरापुरचे उपसरपंच किरण कोळंबे आणि उपतालुका संघटिका करीना कोळंबे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी अनेक समर्थकांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला. नसरापूरमधील प्रभावशाली कार्यकर्ते शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाची स्थानिक पकड कमकुवत झाल्याचं बोललं जात आहे.

तर दुसरीकडे, रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटालाही मोठा धक्का बसला आहे. शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे हे पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांसह आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. अंतर्गत नेत्यांच्या नाराजीमुळे मोरे यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. खरवली ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष खडतर यांचाही मोरे यांच्यासोबत प्रवेश होणार आहे. मोरे माणगावमधून शक्तीप्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

नांदेडच्या देगलूरमध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रवेश करणार

नांदेडच्या देगलूरमध्ये काँग्रेसमध्ये मोठे इन्कमिंग झाले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे माजी उपनगराध्यक्ष अविनाश नीलमवार यांच्यासह 20 माजी नगरसेवक, 8 विद्यमान नगरसेवक, 3 माजी नगराध्यक्ष आणि असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 30 ऑक्टोबर रोजी यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. काँग्रेसचे सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख आणि माजी सभापती अरुण राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. यावेळी प्रवीण देशमुख यांनी माजी मंत्री वसंत पुरके आणि आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्यावर टीका केली. काँग्रेसमधील समन्वय नसल्याने पक्षाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप प्रवीण देशमुख यांनी केला आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पुढाकाराने हा पक्षविस्तार होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.