खोपोली-पेण राज्यमार्गावरील गतिरोधक धोकादायक
दुरुस्तीची मागणी; वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण
खालापूर, ता. २७ (बातमीदार) : खोपोली-पेण राज्यमार्ग हा रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा वाहतूक दुवा असून, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी तसेच अवजड वाहतूक सुरू असते. मार्गाचे काँक्रीटीकरण आणि रुंदीकरणाचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, रस्ता ऐसपैस झाल्याने वाहनचालक वेगाने वाहने हाकू लागले आहेत. वाढत्या वेगामुळे अपघातही वाढल्याने गाव तिथे गतिरोधक बसविण्यात आले आहेत, मात्र हेच गतिरोधक आता अपघातांचे आमंत्रण ठरत असल्याने प्रवासी आणि स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
गतिरोधकांची संरचना तयार करताना भारतीय रस्ते सुरक्षितता नियमांचे पालन न करता मनमानी पद्धतीने तयार करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी गतिरोधक अतिशय उंच, तर काही ठिकाणी खड्ड्याच्या स्वरूपात झाले आहेत. परिणामी वाहनाचा वेग कितीही कमी केला तरी धक्का बसण्याचा धोका कायम राहतो. दुचाकीस्वार आणि प्रवासी वाहनांना अचानक अस्थिरता येऊन नियंत्रण सुटण्याचा संभव वाढला आहे. याशिवाय या गतिरोधकांबाबत पूर्वसूचनेचे कुठलेही फलक किंवा झेब्रा मार्किंग उपलब्ध नाही. रात्रीच्या वेळी दिव्यांची कमतरता असल्याने गतिरोधक दिसतच नाहीत. परिणामी अनेक चालक शेवटच्या क्षणी ब्रेक दाबतात किंवा वळण घेतात. त्यामुळे चालकाला जोराचा धक्का बसतो. काही वाहनचालकांनी तर किरकोळ अपघातांची नोंद केलेली आहे. रुग्णवाहिका, शाळा बसेस आणि मालवाहतूक वाहनांनाही या परिस्थितीतून मोठ्या अडचणीने मार्ग काढावा लागत आहे. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, चालकांसह प्रवाशांचा जीव वाचावा यासाठी गतिरोधक ही संकल्पना महत्त्वाची असली तरी दर्जाहीन व चुकीच्या पद्धतीने बनविल्यास ती धोका वाढविते, याकडे वाहतूक तज्ज्ञांनी निर्देश केले आहेत. नियमांनुसार गतिरोधकांचा विशिष्ट आकार, उंची, झुकाव आणि रंगीत पट्ट्यांचे मार्किंग आवश्यक आहे, परंतु खोपोली-पेण मार्गावर या निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. दरम्यान, आगामी सुट्ट्या आणि पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता या मार्गावरील वाहतूक आणखी वाढणार आहे. त्यामुळे दुर्घटनांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि मार्ग सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने त्वरित सुधारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.