सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु आहे. आशिया कप स्पर्धेत एकही सामना न गमावता टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरलं. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेकडून टी20 वर्ल्डकप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून पाहीलं जात आहे. 29 ऑक्टोबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील बहुतांश खेळाडू हे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसतील यात काही शंका नाही. त्यामुळे खेळाडूंचा फॉर्म आणि त्यांची चाचपणी करण्यासाठी ही मालिका मोठं माध्यम ठरणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने मोठा खुलासा केला आहे. त्याने स्पष्ट केलं की, आशिया कप स्पर्धेपासूनच वर्ल्डकप स्पर्धेची तयारी सुरु झाली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत सांगितलं की, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या दौऱ्याकडे सध्याच्या टी20 प्रशिक्षण पद्धतीचा भाग म्हणून पाहत आहोत. वेगळे परदेशातील आव्हान म्हणून नाही. सूर्यकुमार यादवच्या या खुलाशातून टी20 वर्ल्डकपसाठी काय तयारी सुरु आहे याचा अंदाज येतो. त्यामुळे खेळाडूंना काळजीपूर्वक या मालिकेकडे पाहणं गरजेचं आहे. फिटनेससोबत फॉर्मही तितकाच महत्त्वाचा असणार आहे.
सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘संघाच्या कॉम्बिनेशनमध्ये फार काही बदल झालेला नाही. मागच्या वेळेस आम्ही दक्षिण अफ्रिकेत गेलो होतो तेव्हा आम्ही एक वेगवान गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आणि फिरकीपटूंसह मैदानात उतरलो होतो. परिस्थिती तशीच आहे. उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या आहेत.’ दरम्यान सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलिया दौरा कठीण असल्याचं म्हणायला देखील विसरला नाही. “ऑस्ट्रेलिया हा क्रिकेट खेळण्यासाठी एक सुंदर देश आहे. त्यामुळे मला खात्री आहे की ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना कठीण असेल.”, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
सूर्यकुमार यादवने पुढे स्पष्ट केलं की, “आपण विदेशी भूमीवर खेळत आहोत असे वाटत नाही. म्हणून, आपण या मालिकेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू. ही विश्वचषकाची तयारी आहे.”