गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात चढउतार बघायला मिळाले आहेत. सोने-चांदीच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर चार-पाच दिवसांपासून घसरण सुरू होती. या घसरणीला बुधवारी ब्रेक लागला. बुधवारी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोनं १५०० रुपये प्रति तोळा तर चांदी प्रति किलो १ हजार रुपयांनी महाग झालीय. मंगळवारी सोनं ४३०० रुपयांनी स्वस्त झालं होतं. तर चांदी ६५०० रुपयांनी कमी झाली होती.
सोन्याच्या किंमतीत बुधवारी वाढ झाली असून १० ग्रॅम २ कॅरेट सोनं १ लाख २१ हजार ५८० रुपयांवर पोहोचलं आहे. बुधवारी सकाळी हाच दर १ लाख २० हजार ८२० रुपये इतका होता. तर चांदीचा भावही वधारला आहे. एक किलो चांदीचा दर १ लाख ५२ हजार रुपये इतका झाला आहे.
मोंथाची तीव्रता कमी झाली पण पावसाचा मुक्काम अजून आठवडाभर; कोकणसह विदर्भात 'यलो अलर्ट'अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्यानं पुन्हा एकदा गुंतवणूकदारांनी सोन्याकडे मोर्चा वळवला आहे. फेडरल रिझर्व्हने ०.२५ टक्के व्याजदर कमी केला. व्याजदर कमी केल्यानं बॉन्डकडे पाठ फिरवून गुंतवणूकदार सोन्यात सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे वळतात. परदेशी बाजारातही चांदीच्या दरात २.८५ टक्क्यांनी वाढ झाली असून चांदी ४८.४० डॉलर प्रति औंस झालीय.
तज्ज्ञांच्या मते डॉलर कमकुवत झाल्यास किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात स्थैर्य असेल तर सोन्याच्या दरात घसरण होते. पण जागतिक तणाव, महागाई यांचा दबाव असेल तर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं हा अजूनही विश्वासार्ह पर्याय मानला जातो. पण तात्काळ नफा मिळवण्याच्या उद्देशानं यात गुंतवणूक करणाऱ्यांनी सावध रहावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.