रत्नागिरीत २ नोव्हेंबरला रोलर कोस्टर सायक्लोथॉनचा थरार
esakal October 30, 2025 10:45 PM

-rat३०p८.jpg-
KOP२५O०१३३३
रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून प्रसाद हातखंबकर, महेश सावंत, डॉ. नितीन सनगर, प्रसाद देवस्थळी, विनायक पावसकर, दर्शन जाधव, सचिन नाचणकर.
----
रत्नागिरीत रोलर कोस्टर सायक्लोथॉनचा थरार
सायकलिस्ट क्लब; २ नोव्हेंबरला देशभरातील २२५ स्पर्धकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : कोकणात क्रीडा पर्यटनवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सलग तिसऱ्या वर्षी रोलर कोस्टर सायक्लोथॉनचे आयोजन येत्या २ नोव्हेंबर रोजी केले आहे. भाट्ये ते गावखडी व परत अशा ५० किमीच्या या स्पर्धेत देशभरातील २२५हून अधिक सायकलपटू सहभागी होणार आहेत. यंदा प्रथमच शालेय विद्यार्थ्यांसाठी २५ किमीचा गटही ठेवण्यात आला आहे. क्लबतर्फे आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
भाट्ये येथून सकाळी ६ वा. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते होईल. १० वा. विवेक हॉटेल येथे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. स्पर्धेत देशभरातील स्पर्धक सहभागी होत असून, स्पर्धकांची राहण्याची आणि जेवण, नाश्त्याची व्यवस्था हॉटेल विवेकने केली आहे. रत्नागिरीतील विविध संस्था, व्यक्तींनी या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य केले आहे. स्पर्धेच्या मार्गावरील खड्ड्यांची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णवाहिका, डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुवर्णसूर्य फाउंडेशन सहआयोजक असून, अॅपरल पार्टनर टिलेज, असोसिएट पार्टनर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, ट्रॉफी पार्टनर खेडशीचे माजी सरपंच निरंजन सुर्वे, एनर्जी पार्टनर इनर्झल, एचटुओ पार्टनर अॅड प्लस, न्युट्रिशन पार्टनर बॉन अपेटाईट यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. स्पर्धकांना १ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजल्यापासून हॉटेल विवेक येथे बिब नंबरचे वितरण केले जाणार आहे. या वेळी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सायकलपटू व धावपटूंनी गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना सन्मानित केले जाणार आहे.
---
चौकट १
पावणेदोन लाखांची बक्षिसे
रोलर कोस्टर सायक्लोथॉनमध्ये पुरुष व महिलांसाठी ११ ते १७ वयोगटातील मुले, १८ ते ३५ वयोगट एलाईट ग्रुप, ३६ ते ५० वयाचा मास्टर ग्रुप आणि ५१च्या वरील ज्येष्ठ नागरिकांचे स्वतंत्र गट आहेत. विजेत्यांना १ लाख ७५ हजार रुपयांची बक्षिसे, चषक, स्पर्धा वेळेत पूर्ण करणाऱ्यांना आकर्षक पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मुलांसाठी भाट्ये ते गोळप व परत आणि मोठ्या गटासाठी भाट्ये ते गावखडी व परत असा मार्ग आहे. मार्गावर विविध ठिकाणी पाणी, सरबताची व्यवस्था, ढोलताशांच्या गजरात स्पर्धकांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे जय हनुमान मित्रमंडळदेखील रूट सपोर्ट करणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.