पालघर, ता. ३० (बातमीदार) : नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा नोव्हेंबरमधील पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी विविध पक्षांतील इच्छुकांनी आपल्या परीने सुरू केली आहे. नगर परिषदेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती होण्याची शक्यता दुरावल्याचे दिसून येत आहे. नगराध्यक्षपदासाठी या दोन्ही पक्षांमधून इच्छुकांची गर्दी झाली असून, त्यांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
पालघर नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून माजी नगरसेवक प्रीतम राऊत हेही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. भाजपने निवडणूक स्वतंत्र लढविण्याची तयारी सुरू केली असून, कोणत्याही परिस्थितीत युती करायची नाही, असे ठाम ठरविले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश घेतलेले कैलास म्हात्रे यांना पक्षातील वरिष्ठाने नगराध्यक्षपदासाठी आश्वासित केले आहे. त्यानुसारच म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पाटील हेही इच्छुक आहेत, मात्र नगराध्यक्षपदासाठी कोणाचे नाव सूचित केले जाते, हे काही दिवसांत पुढे येणार आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटामधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू, माजी उपनगराध्यक्ष उत्तम घरत यांचे नाव पुढे आलेले आहे, मात्र याच गटामधून माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे हेही इच्छुक आहेत. शिंदे गटामधून कोणाच्या गळ्यात उमेदवारीसाठी माळ पडते, हे येत्या काळात समजून येईल.
समाजमाध्यमावर जोरदार प्रचार
भाजप-शिवसेना यांची युती झाली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रही भूमिका घेतलेली आहे, मात्र भाजपच्या गटामध्ये नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक उमेदवारांची गर्दी असल्याने युती होणे अशक्यप्रय असल्याचे चर्चा आहे. या सर्व इच्छुक उमेदवारांनी समाजमाध्यमावरून त्यांच्या मित्रपरिवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे.
कोट्यवधीमध्ये उड्डाणे
गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवामध्ये आपापल्या मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटीगाठी हे इच्छुक घेत आहेत. जो उमेदवार प्रचारासाठी जास्तीत जास्त खर्च करू शकेल, अशांनी उमेदवारी मागण्याचे धाडस करावे, असेही काही पक्षांतून सुचविले जात आहे. त्यामुळे कोट्यवधीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. सध्या नगराध्यक्षपदाबरोबर नगरसेवकांच्याही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.