Miraj Minor Ganja : झटपट पैसे मिळवण्याचा नाद बेक्कार! मिसरुट न फुटलेली पोरंही गांजा विकताहेत; मिरजेत अल्पवयीनांकडून दोन किलो गांजा जप्त
esakal October 30, 2025 03:45 PM

Miraj Police : मिरज शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पिछाडीस गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलांकडून तब्बल दोन किलो गांजा जप्त केला. झटपट पैसे मिळवण्यासाठी आणि चैन करण्याच्या उद्देशाने दोघेही गांजा विक्रीच्या तयारीत होते. त्यांच्याकडील दोन किलो गांजा आणि सुमारे ७० हजार रुपये किमतीची दुचाकी असा मिळून १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

काही दिवसांपासून शहरात गांजा विक्रीचे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने शहरात गस्त वाढवली होती. या गस्ती दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पिछाडीस दोन तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ छापा टाकला. पोलिसांना पाहताच दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडील बॅग तपासल्यावर त्यामध्ये दोन किलो गांजा आढळला. या गांजाची किंमत बाजारात सुमारे ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, दोघेही या गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असल्याचे तपासात उघड झाले. अल्पवयीन असल्याने कोणालाही संशय येणार नाही, असा विचार करून त्यांनी हा गैरकृत्याचा मार्ग अवलंबल्याचे पोलिसांना समजले.

Kolhapur Parikh Pool : अखेर कोल्हापुरातील परीख पुलाच्या रस्त्याचे काम सुरू, एका बाजूची वाहतूक बंद; असे असतील पर्यायी मार्ग

पोलिसांनी गांजा आणि दुचाकीसह दोघांना ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी बाल न्याय मंडळाकडे सुपुर्द केले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, दोघांनी गांजा कुठून आणला आणि कोणाकडे विक्री करणार होते, याचा शोध पोलिस घेत आहेत. शहरातील अशा प्रकारच्या अवैध व्यापारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून, पुढील काही दिवसांत आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.