Cricketer Death : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T20 सामन्याआधी दु:खद घटना, युवा क्रिकेटरचा मैदानात मृत्यू, काय घडलं?
Tv9 Marathi October 30, 2025 03:45 PM

Australia Cricketer Ben Austin Death : मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा T20 सामना होणार आहे. मात्र, त्याआधी तिथे एका क्रिकेटरचा मृत्यू झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. मेलबर्नच्या पूर्व भागातील ही घटना आहे. नेट्समध्ये प्रॅक्टिस करताना क्रिकेटर बेन ऑस्टिन गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत बेन ऑस्टिनला रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. ऑस्टिनला 28 ऑक्टोंबरला ही दुखापत झालेली. दोन दिवसांनी म्हणजे 30 ऑक्टोंबर रोजी गुरुवारी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.

17 वर्षांचा बेन ऑस्टिन मेलबर्न ईस्टच्या फर्नट्री गली क्रिकेट क्लबकडून खेळायचा. 30 ऑक्टोंबरच्या सकाळी क्लबने एक स्टेटमेंट जारी करुन युवा क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. बेन ऑस्टिनच्या मृत्यूमुळे आम्ही दु:खी आहोत, असं क्लबने म्हटलय. या घटनेने संपूर्ण क्रिकेट समुदायावर शोककळा पसरली आहे. या कठीण काळात आम्ही कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत, असं क्लबने सोशल मीडियाद्वारे म्हटलय.

त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला

17 वर्षांचा बेन ऑस्टिन फलंदाज होता. नेट्समध्ये बॉलिंग मशिनद्वारे तो प्रॅक्टिस करत होता. त्याने हेल्मेटही घातलेलं. पण चेंडू त्याच्या मानेला लागला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. एंबुलेंस विक्टोरियानुसार, 28 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. फर्नट्री गली क्रिकेट क्लबकडून त्यांना कॉल आलेला. रुग्णवाहिकेने बेन ऑस्टिनला नजीकच्या मोनाश मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याचा मृत्यू झाला.

फिल ह्यूजच्या घटनेची आठवण ताजी झाली

ऑस्ट्रेलियातील युवा क्रिकेटर बेन ऑस्टिनच्या मृत्यूने एक दशकापूर्वीच्या फिल ह्यूजच्या घटनेची आठवण करुन दिली. 2014 साली शेफील्ड शील्ड टुर्नामेंटमध्ये फलंदाजी करताना फिल ह्यूजच्या मृत्यू सुद्धा चेंडू मानेला लागून झाला होता. त्यालाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. पण तिथे त्याने अंतिम श्वास घेतला. फिल ह्ययूजच्या मृत्यूनंतर क्रिकेटमध्ये सेफ्टी साधनांवर जास्त भर देण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.