माेठी बातमी! 'भाजपच्या 'कुटुंबा'त २९ जणांचा 'घाऊक' प्रवेश'; साेलापूर जिल्ह्यातील माजी आमदार पाटील, माने यांच्यासह शिंदे, क्षीरसागर यांना पायघड्या
esakal October 30, 2025 11:45 PM

सोलापूर: जिल्ह्यातील दोन माजी आमदार व एका माजी आमदाराच्या दोघा पुत्रांसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या भाजपमधील घाऊक ‘इनकमिंग’मुळे महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना व काँग्रेसलाही जबर धक्का बसला आहे. मुंबई येथील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात एक कुटुंब, जुन्यांचा सन्मान अन् नव्यांचा विश्वासाला तडा न जाऊ देण्याच्या आणाभाका घेत जिल्ह्यातील २९ नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.

Woman Doctor Case: आम्हाला गोवण्याचे विरोधकांचे षडयंत्र: दिलीपसिंह भोसले; सुषमा अंधारे, आगवणेंच्या मागे कोणीतरी मास्टरमाइंड

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम झाला. माजी आमदार राजन पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र विक्रांत व अजिंक्यराणा पाटील, यशवंत माने, शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, काँग्रेसच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवानंद गुंड यांच्यासह माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह व विक्रमसिंह शिंदे या बंधूंसह माढा विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण, पालकमंत्री गोरे यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम सातपुते, प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार, रणवीर राऊत आदी जिल्ह्यातील नेते - पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रवेश कार्यक्रमात बोलताना माजी आमदार राजन पाटील यांनी शरीरात रक्त असेपर्यंत हाती भाजपचा कमळ घेऊन वाटचाल करू, असे सांगितले. तर जुन्यांचा सन्मान राखतानाच नव्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे या भाजपच्या नेत्यांनी दिली. तसेच जुन्या - नव्याचा वाद सोडून एक कुटुंब म्हणून येत्या काळातील सर्व निवडणुका जिंका, असे आवाहन केले.

जुन्या - नव्यांना सोबत घेऊन सत्ता आणू ः पालकमंत्री

ज्या विश्वासाने आज अनेकांनी भाजप प्रवेश केला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आपण त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहू. जुन्या - नव्या सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्यात पक्ष उभा करू. आगामी निवडणुकीत भाजपची आणि आवश्यक तेथे महायुतीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करू. प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखण्याची भूमिका पक्ष नेतृत्व घेईल, अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सत्तेसाठी संधी साधणारे नव्हे, निष्ठा जपणारे ः राजन पाटील

संधी साधून राजकारण करणारा आमचा विचार, वारसा नाही, तर निष्ठा जपणारे असल्याचे सांगून माजी आमदार राजन पाटील म्हणाले, कोणत्याही सत्तेची अपेक्षा न करता ४० वर्षे एका पक्षात राहिलो. येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली भाजप भक्कम होईल. त्यांचे नेतृत्व सक्षम असल्याची तरुणांची खात्री झाली आहे. भाजपचा विचार शेवटच्या माणसापर्यंत नेण्यासाठी माझ्यासह समर्थक कार्यकर्ते काम करतील. त्या माध्यमातून परिवर्तन घडवत आगामी सर्व निवडणुकांत एकट्या भाजपचा झेंडा फडकवू, असे आश्वासन सर्व जुन्या - नव्या कार्यकर्त्यांकडून देतो.

बबनदादांशी चर्चा करूनच निर्णय ः रणजितसिंह शिंदे

वैद्यकीय उपचाराच्या निमित्ताने माजी आमदार बबनराव शिंदे हे अमेरिकेत आहेत. त्यांचे आरोग्य चांगले असल्याचे सांगून त्यांचे पुत्र, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे म्हणाले, बबनदादांशी चर्चा करूनच भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. येत्या सर्व निवडणुकांत माढ्यातील सर्व जागी भाजप निवडून आणू. गेल्या दहा वर्षांत देश - राज्याची प्रगती होत आहे. त्यामुळे भाजपसोबत काम करत प्रगतीला साथ देऊ. त्या माध्यमातून भाजपची ताकद बळकट करू.

कल्याणशेट्टींची भूमिका महत्त्वाची

अनेक नेत्यांच्या पक्ष प्रवेशात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भूमिका महत्त्वाची असल्याचा गौरवपर उल्लेख पालकमंत्री गोरे यांनी केला. जिल्ह्यात पक्ष वाढावा, अशी भूमिका घेऊन ते काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

सहकारी परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा

राजन पाटील यांनी राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिले. वर्षभरापूर्वी २७ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांची या पदावर निवड झाली होती. हे पद राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना मिळाले होते. त्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी त्या पत्रात म्हटले आहे.

Inspiring journey: 'डॉ. सुधीर पवारांचा सलग धावण्याचा विक्रम'; बारा तासांत १०१ किलोमीटर अंतर पार; सातारा-मेढा-सातारा दोन वेळा फेरी एक कुटुंब म्हणून भूमिका हवी ः प्रदेशाध्यक्ष चव्हाण

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, पक्ष प्रथम या भूमिकेतून काम करा. कोणावर अन्याय करू नका, येत्या काळात एक कुटुंब म्हणून भूमिका घेण्याची अत्यंत गरज आहे. चर्चेत कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भावना पाहता पक्ष वाढावा, हीच प्रत्येकाची भूमिका आहे. आपण एक कुटुंब आहोत यासह राष्ट्रीयत्वाचा विचार पुढे नेण्याची गरज आहे. ज्या विश्वासाने अनेकजण पक्षात आले आहेत, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणींतही अभ्यासाच्या बळावर राज्याला सर्वच क्षेत्रांत पुढे नेले आहे, असेही ते म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.