रविवारपासून ग्रामदेवतांचा जागर
रायगडमधील यात्रांच्या हंगामाला सुरुवात, लाखोंची आर्थिक उलाढाल
मनोज कळमकर ः सकाळ वृत्तसेवा
खालापूर, ता.२९ : खोपोली येथील ताकई-साजगावच्या बोंबल्या विठोबा यात्रा रविवार (ता.२) पासून सुरु होत आहे. या यात्रेनंतर जिल्ह्यातील विविध ग्रामदेवतांच्या यात्रांना सुरूवात होते. जत्रांमधील व्यापारातून अर्थकारणालाही चालना मिळणार असल्याने पावसामुळे आलेले नैराश्य हटणार आहे.
अलिबाग तालुक्यातील आवास येथील नागेश्वरची यात्रा, मापगावची कनकेश्वर यात्रा, वरसोलीची विठोबाची यात्रा तसेच दत्त जयंतीला चौल-भोवाळेची यात्रा सुरू होते. एकविरा देवीचा यात्रा उत्सव झाल्यानंतर जिल्ह्यातील सलग पंधरा दिवस चालणाऱ्या ताकई-साजगावच्या बोंबल्या विठोबा यात्रा आकर्षणाचे केंद्र असते. कार्तिकी एकादशीला पंढरपुरची यात्रा सुरु होते, त्याच दिवसापासून साजगावच्या यात्रेला सुरुवात होते. अतिवृष्टीमुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. शेतीच्या कामांमध्ये अडकलेल्या भाविकांना पंढरपुरला जाता येत नाही. त्यामुळे धाकटी पंढरी असलेल्या साजगावच्या यात्रांमध्ये अनेकजण देवदर्शनासाठी येतात. या यात्रेमध्ये मिठाई, कपडेलक्ते, गृहपयोगी भांडी, मसाल्यांच्या पदार्थांसह सुकी मच्छीची विक्री होती.
साजगावच्या यात्रेपासून कोकणात सुरु होणारा यात्रांचा हंगाम थेट मेपर्यंत चालतो. अनेक शतकांपासून ही परंपरा भव्यदिव्य स्वरुपात सुरु आहे. त्यामुळे रायगडमधूनच नव्हे तर पुणे, कल्याण, मुंबई, महाड परिसरातील हजारो भाविकांसाठी यात्रा श्रद्धास्थान ठरत आहेत.
-----------------------------------------
वरसोलीची विठोबाची यात्रा
अलिबाग शहराला लागून असलेल्या वरसोली पाच दिवस ही यात्रा भरते. वाढत्या शहरीकरणामुळे येथे दुकाने थाटण्यासाठी जागा अपुरी पडु लागली आहे. पण कोणत्याही अडथळ्याशिवाय यात्रा भरवण्याचा प्रयत्न मंदिर प्रशासनाचे आहेत. दुकानदारांसाठी पाणी, शौचालय, विजेची सुविधा देण्याची जबाबदारी वरसोली ग्रामपंचायतीची असते. त्यास अलिबाग नगरपालिकेनेही सहकार्य करण्याची दर्शवली आहे.
-------------------------------------
आवासची नागोबाची यात्र
आवास गावात पुरातन श्री नागोबा मंदिर आहे. एकेकाळी नागोबा नावाचे सत्पुरुष राहत होते. त्यांच्या सोबत त्यांचे शिष्य बुधोबा, चांगोबा वस्तीला होते, अशी आख्यायिका आवास भागात प्रसिद्ध आहे. नागोबांची शंभरी पूर्ण झाल्यावर त्यांनी आणि यथावकाश त्यांच्या शिष्यांनी संजीवन समाधी घेतली. त्याच पाषाण रूपांची येथे पूजा केली जाते. हे स्थान नागोबा देवस्थान म्हणून ओळखले जाते.
--------------------------------------
चौलच्या दत्तदिगंबराची यात्रा
रेवदंडा-चौलपासून २ किलोमीटर अंतरावर भोवाळे गावातील टेकडीवर दत्तमंदिर आहे. ७०० पायऱ्या चढून गेल्यावर दत्ताचे दर्शन घेता येते.टेकडीच्या पायथ्याची पाच दिवसांची यात्रा भरते. दरवर्षी दत्तजयंतीपासून ही यात्रा सुरु होते. पहिल्या दिवशी मुंबईत राहणाऱ्या मंडळींनी तयार केलेला चांदीचा मुखवटा चौल थेरोंडा येथून पालखीतून मंदिरात आणतात. मूळ दत्त मूर्तीची यथासांग पूजा करून हा मुखवटा मूर्तीला लावतात.
--------------------------------------
तपोभूमी कनकेश्वरची यात्रा
अलिबागपासून काही अंतरावर असलेल्या कनकेश्वर येथे अनेक ऋषीमुनी, शिवभक्तांनी तपश्चर्या केली. त्यामुळे तपोभूमी म्हणून हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. डोंगरावर असलेल्या निसर्गरम्य कनकेश्वर ठिकाणी एक अतिप्राचीन स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे. सरखेल राघोजीराजे आंग्रे यांचे तत्कालीन दिवाण गोविंद रेवादास यांनी १७६४ मध्ये मंदिराकडे जाणाऱ्या ७५० पायऱ्या बांधल्या. डोंगराच्या पायथ्याशी मापगाव येथे एक दिवसाची यात्रा भरते.
---------------------------
काळानुरूप बदलते स्वरूप
- यात्रेला ग्रामीण भागात वेगळे स्थान आहे. लोकांच्या मनाला आनंद देणारा हा लोकोत्सव आहे. या निमित्ताने सगे-सोयरे, पै-पाहुणे, मित्रमंडळी आवर्जून एकत्र येतात. बच्चेकंपनीसाठी यात्रा म्हणजे पर्वणीच असते.
- पूर्वी कमणुकीची साधने नव्हती तेव्हा जत्रेत महाराष्ट्राची लोककला अर्थात तमाशाचा फडही रंगत असे. अमन तांबे, सुरेखा पुणेकर, काळू-बाळू आदी नामवंत कलाकार या ठिकाणी आपली कला सादर करत. मात्र, अलिकडच्या काळात तमाशाची जागा डान्स पार्टीने घेतली.
़ः- लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर बैलबाजार आटला आहे, पण सुक्या मच्छीची विक्री करणाऱ्या ११५ विक्रेत्यांनी साजगाव मंदिर व्यवस्थापनाकडे नोंदणी केलेली आहे. विजेच्या दिव्यांची सुविधा नव्हती तेव्हा यात्रा दिवसा भरायची, आता रात्री उशीरापर्यंत ही यात्रा सुरु असते.
------------------------------
जिल्ह्यातील प्रमुख यात्रा
साजगाव (बोबल्या विठोबा) - कार्तिकी शु.एकादशी, २ नोव्हेंबर(पंधरा दिवस)
आवास (श्री क्षेत्र नागेश्वर) - कार्तिकी त्रयोदशी, ४ नोव्हेंबर (एक दिवस)
मापगाव (श्री क्षेत्र कनकेश्वर) - त्रिपुरारी पौर्णिमा, ५,६ नोव्हेंबर (दोन दिवस)
वरसोली (प्रती पंढरी) - उत्पत्ती एकादशी, १५ नोव्हेंबर (पाच दिवस)
चौल-भोवाळे (दत्ताची यात्रा)- मार्गशिष पौर्णिमा ४ डिसेंबर (पाच दिवस)
------------------------
कोकणातील यात्रांची परंपरा संतांनी सुरु केली. ज्या भाविकांना पंढरपूर, आळंदीची वारी करता येत नाही ते भाविक साजगाव, वरसोली यात्रांमध्ये लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेतात. तीनशे-साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास असलेल्या यात्रांमध्ये काळानुरुप अमुलाग्र बदल झाले आहेत.
- रमेश नाईक, मुख्य विश्वस्त, विठ्ठल-रखुमाई मंदिर, वरसोली