Uday Samant vs Narayan Rane : उदय सामंत आणि नारायण राणेंमध्ये कलगीतुरा; भाजप, शिवसेना कोकणात स्वबळावर लढणार?
esakal October 31, 2025 04:45 PM

Konkan politics BJP Shiv Sena : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा भगवा किंवा शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. महायुतीसाठी समन्वयक समिती आग्रही आहे. मात्र, शिवसेनेला कुठेच कमी लेखू नये, आम्ही संयमी आहोत. एक घाव, दोन तुकडे करणार नाही. महायुती झाल्यास सन्मान राखला गेला पाहिजे, असे सांगत महायुती झाली नाही तर उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवा. मैत्रीपूर्ण लढतीसाठी सक्षम राहा, असे आवाहन शिवसेना संपर्कमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

दीपक केसरकर इलेक्शन मोडवर आले की समोरचे शिल्लक राहत नाहीत. केसरकरांची शांतता वादळापूर्वीची आहे. नारायण राणेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम असणार आहे. त्यांच्यासारख नेतृत्व नीलेश राणे करत आहेत. नारायण राणेंच्या मागे उभा राहिलेला जिल्हा आम्ही बघितला. तीच माणसं आज नीलेश राणेंच्यामागे उभी आहेत. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून सिंधुदुर्गची ओळख राज्यात होईल यात शंका नाही, असा विश्वासही श्री. सामंत यांनी व्यक्त केला.

येथील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘केसरकर पायानं मारतात ती गाठ हातानं सुटत नाही. महायुतीसाठी समन्वयक समिती आग्रही आहे. वाईट घडू नये म्हणून एकनाथ शिंदे देखील पुढाकार घेत आहेत. जिल्हाप्रमुख संजू परब यांसारखा सतर्क पदाधिकारी असल्यास संघटना निश्चित वाढणार आहे. दुसरीकडे निधीची मोठी ताकद केसरकर यांनी उभी केली आहे. त्यामुळे हा मेळावा आदेशाचा आहे, असे समजून शिवसेनेचा उमेदवार असणार, अशी भूमिका घेऊन कामाला लागा, प्रचारास सुरुवात करा.

नारायण राणेंसारख नेतृत्व निलेश राणे करत आहेत. आताच पालकमंत्र्यांसह एकत्र विमानाने आलो. कुणाला कमी लेखण्याच काम होणार नाही. पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा आराखडा असल्यास तो द्या, त्याच स्वागतही करू. मात्र, शिवसेनेला कमी लेखू नये. मित्रपक्षानं आमचा सन्मान केला पाहिजे ही भुमिका आहे. ‘’’’हम किसी से कम नही’’’’ केसरकरांनी फक्त लढ म्हणावं, आम्ही तुमच्या आशीर्वादान लढू, विरोधकांच डिपॉझिट जप्त होईल असे उमेदवार उभे करू.”

श्री. केसरकर म्हणाले, “युतीत मिठाचा खडा टाकण्याचा माझा हेतू नाही. मात्र, स्थानिक पातळीवर वेगळी विधान येतात. तोडायच असेल तर आमच्याकडून तुटलं असं नको. मैत्रीचा धर्म आम्ही जाणतो. सोबत आले तर सोबत; अन्यथा, त्यांच्या शिवाय लढावं लागेल. महायुती झाली तर ती वेळेत झाली पाहिजे. नारायण राणे आमचे खासदार आहेत. त्यांनाही मान दिला गेला पाहिजे. महायुती न झाल्यास दुसऱ्याला संधी मिळता नये याचीही काळजी घेतली पाहिजे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रचाराला मी फिरणार आहे.”

MP Narayan Rane: सावडावमध्ये बारमाही पर्यटन बहरेल: खासदार नारायण राणे; धबधबा सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा

आमदार राणे म्हणाले, “सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीत आपली ताकद आहे. त्यामुळे थांबायची वेळ गेली. हीच ती वेळ आहे, तुम्ही तयारीला लागा. सावंतवाडी, कुडाळवर डोळा आहे. आपली किंमत मैदानात दाखवून द्या, गप्पं बसण्याचे दिवस नाहीत. तीन पैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत. आपल्या ताकदीला कोणी नाकारू शकत नाही. आमचे नेते युतीचा निर्णय घेतील. मित्रपक्षाची विधान बघता दोन दिवसांपूर्वी आम्ही स्वबळाचा नारा दिला. माझ्या मतदारसंघात सर्वात जास्त लक्ष आहे. आपली ताकद दाखवून द्यायची ही निवडणूक आहे.”

श्री. तेली म्हणाले, “लढाईसाठी सैनिकांनी तयार असले पाहिजे ही नारायण राणेंची शिकवण आहे. त्यामुळे आम्हीही तयारीत आहोत. जर कोणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यावं लागेल. आताची निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. वेगळं लढण्याची इच्छा नव्हती. युती म्हणून आमची भूमिका असताना समोरून स्वबळाचा नारा दिला जातोय. ऐनवेळी युती न झाल्यास करायचं काय0 आपण तयार असल पाहिजे.” जिल्हाप्रमुख परब यांनी, माझ्या पाठिशी सर्वजण आहेत. त्यामुळे आम्हाला जिंकण्यासाठी लढायच आहे, असा विश्वास व्यक्त केला. केसरकर यांनी कोट्यवधींचा निधी दिलाय, काम केलीत. याचा फायदा पक्षाला होत आहे. मंत्री सामंत यांनी देखील असच लक्ष आमच्यावर ठेवावे, असे सांगितले.

केसरकरांनी ग्रीन सिग्नल द्यावा

कुंपणावर उभं असणाऱ्यांना कधी पक्षात घ्यायचं ते तुम्ही सांगा, आपला हॉल हाऊसफुल्ल होईल. फक्त, आमदार केसरकरांनी त्यासाठी ग्रीन सिग्नल देणे गरजेचे आहे. त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यास समोर काही शिल्लक ठेवणार नाही, असा विश्वास आमदार राणे यांनी यावेळी व्यक्त केला. शिंदे शिवसेनेमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांचा बाबतीत त्यांनी हे विधान केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.