 
            Bharat Gogawale And Sunil Tatkare : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. स्थानिक पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आपापल्या पातळीवर जागावाटपावर चर्चा चालू आहे. कुठे या चर्चेतून सकारात्मक परिणाम दिसत आहेत. तर कुठे जागावाटपावरून दोन पक्ष आमनेसामने येताना दिसतायत. महायुतीत तर हा संघर्ष चांगलाच पेटलेला दिसतोय. रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले तसेच अजित पवार यांच्या पक्षाचे नेते सुनिल तटकरे थेट आमनेसामने आले आहेत. गोगावले यांनी सुचवलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानंतर तटकरे चांगलेच संतापले आहेत.
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 59 जागांवर महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी हा फॉर्म्युला सर्वांसमोर ठेवला होता. मात्र या फॉर्मुलाची खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खालापूर येथील एका कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांची खिल्ली उडविली होती. त्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी याला प्रत्युत्तर दिलंय. आम्ही कोणाची चिंता करत नाही. शिवाय आम्हाला आता कोणाची चिंता करण्याची गरज नाही. आम्ही आता आमच्या बंधनातून मुक्त झालोय. त्यामुळे आम्ही आमच्या कामाला लागलो असून रवी मुंढे यांच्या पक्ष प्रवेशावरून आमच्या विजयाची नांदी दिसून येत असल्याचं, भरत गोगावले म्हणाले.
सुनील तटकरे यांना आम्ही निवडून आणले आणि त्यांची राज्यात एकमेव पक्षाची जागा निवडून आली. मात्र त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. सबुरीका फस मिठा होता है त्यामुळे जो चुकीचं वागेल त्याला त्याच्या कर्माची फळे इथेच भरायची आहेत, असा टोला गोगावले यांनी सुनील तटकरे यांना लगावला.
रायगडातील रोहा येथे 30 ऑक्टोबर रोजी आमदार महेंद्र दळवी यांचा नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर आगपाखड केली आहे. आमच्या मनामध्ये कधीच पाप नाही. आम्ही खुल्या मनाने प्रेम करतो. श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगावमधील नागरिकांच्या अडचणी आम्ही सोडवतो. येथील जनता आमच्याकडे न्यायहक्कासाठी येते. त्यामुळे ईश्वर आणि अल्लाहकडे दादागिरी करायची नाही, असाही हल्लाबोल तटकरे यांनी केला.