लवळे ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांचा राजीनामा
esakal November 01, 2025 05:45 AM

पिरंगुट, ता. ३१ : लवळे (ता. मुळशी) ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांनी पदाचा राजिनामा दिला आहे. किमया गावडे, अजित चांदिलकर, राणी केदारी, राहुल खरात आदी सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराला, तसेच जातीयवादाला कंटाळून राजीनामा दिल्याचे सांगितले. बुधवारी (ता. २९) झालेल्या ग्रामसभेत राजीनामे देऊन या सदस्यांनी सभात्याग केला होता.
याबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले होते, परंतु तरी देखील जातीची आणि समाजाची विभागणी करीत सरपंच रंजित राऊत व सदस्य संजय सातव यांनी मिळून आम्हाला कायमच दुय्यम वागणूक दिली. याशिवाय आम्ही सुचविलेली विकासकामे न घेता फक्त आणि फक्त त्यांच्याच मनाप्रमाणे कारभार करीत राहिले. प्रत्येक विकास कामात ठेकेदार फक्त नावाला नेमून त्यांच्या नावावर हेच काम करत होते. त्यामुळे ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत, याची गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करावी. यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल साकोरे हेदेखील सामील आहेत. दोन वर्षांपासून दलित वस्तीसाठी ३५ लाख रुपये निधी पडून आहे, परंतु कित्येकदा सूचना देऊनदेखील त्या ठिकाणी तो खर्च केला गेला नाही. दलित वस्तीत आरओ फिल्टर बसविताना त्यातही मोठा गैरव्यवहार झाला. परिसरातील मोठमोठ्या संस्थांच्या सीएसआर निधीतून कामे न घेता परस्पर लाटण्याची भूमिका घेतली गेली. स्मशानभूमीच्या नावाखाली खासगी मिळकतीसाठी देवस्थान जमिनीतून काँक्रिट रस्ता करून दिला. सरपंच, उपसरपंच आणि सदस्य गावाच्या हिताचे काम करत नसून, खासगी संस्थांच्या हिताचे काम करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या नावाखाली घेतलेल्या जागेवर संविधान भवन बांधण्याऐवजी आरोग्य उपकेंद्रासाठी दिली. त्या जागेतील दलित समाजाची देवस्थाने उखडून फेकून दिली. त्यामुळे दलित समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे जातीयवादी ग्रामपंचायतीच्या त्रासाला कंटाळून राजीनामे दिले आहेत.

राजीनामा दिलेल्या सदस्यांनी ग्रामपंचायतीवर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. सर्व कामे कायदेशीर व नियमांना धरून केलेली आहे. त्यांचे आरोप हे केवळ राजकीय द्वेषापोटी केलेले आहेत.
- विठ्ठल साकोरे,
ग्रामपंचायत अधिकारी, लवळे (ता. मुळशी)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.