तीन वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन होता, आज घेतली मंत्रिपदाची शपथ
Tv9 Marathi October 31, 2025 09:45 PM

तीन वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणारा खेळाडू आता मंत्री बनला आहे. टीम इंडियाचा हा माजी कर्णधार आता काँग्रेस पक्षामध्ये आहे. मोहम्मद अझरुद्दीनने मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. तेलंगण सरकारच्या मंत्रिमंडळात अझरुद्दीनचा मंत्री म्हणून समावेश झाला आहे. राजभवनाकडून पत्रक काढण्यात आलेलं. त्यात म्हटलेलं की, मोहम्मद अझरुद्दीन शुक्रवारी सकाळी मंत्रिपदाची शपथ घेईल. जिष्णू देव वर्मा यांनी अझरुद्दीनला मंत्रि‍पदाची शपथ दिली.

“मोहम्मद अझरुद्दीनलामंत्री बनवायला भाजपने विरोध केला आहे. मोहम्मद अझरुद्दीनला मंत्री बनवण्यामागे फक्त आगामी ज्युबली हिल्सच्या पोटनिवडणुकीत मतदारांच्या एका समुदायाला आकर्षित करुन मत मिळवण्याचा उद्देश आहे. हे आदर्श आचारसंहितेच उल्लंघन आहे” अशी भाजपच्या शधीधर रेड्डी यांनी टीका केली.

अझरुद्दीनला का मंत्री बनवलं?

“आदर्श आचारसंहिता सगळ्या हैदराबाद शहराला लागू नाही. पण राज्य मंत्रिमंडळात अझरुद्दीनचा समावेश करण्याच्या प्रस्तावामुळे ज्युबली हिल्सच्या पोटनिवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. अझरुद्दीन तिथला मतदार आहे” असं शधीधर रेड्डी म्हणाले.

भाजपचा आक्षेप का?

2023 च्या विधानसभा निवडणुकीत मोहम्मद अझरुद्दीनने ज्युबली हिल्स मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, याकडे शशीधर रेड्डी यांनी लक्ष वेधलं. त्यामुळे “अझरुद्दीनला मंत्री बनवण्यामागे काँग्रेसचा चांगला हेतू नाही. ज्युबली हिल्स विधानसभा मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे” अशी टीका शशीधर रेड्डी यांनी केली.

काँग्रेसची भूमिका काय?

तेलंगण प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते सय्यद निझामुद्दीन यांनी भाजप आणि भारत राष्ट्र समितीवर उलटा आरोप केला. मोहम्मद अझरुद्दीनला विरोध म्हणजे अल्पसंख्यांकांना राजकीय प्रतिनिधीत्व नाकारण्याची भाजप आणि बीआरएसची भूमिका आहे असं सय्यद निझामुद्दीन म्हणाले.

व्यक्तिगत जीवनामुळे चर्चेत

मोहम्मद अझरुद्दीनला देशभरात लोक उत्तम क्रिकेटर म्हणून ओळखतात. हैदराबादमधून येणाऱ्या अझरुद्दीने जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. अनेक वर्ष तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. 1992,1996 आणि 1999 अशा सलग तीन वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद अझरुद्दीने भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व केलं. मोहम्मद अझरुद्दीन त्याच्या व्यक्तीगत जीवनामुळे सुद्धा चर्चेत राहिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.