 
            स्थानिक स्वाराज्य संस्थांची निवडणूक लक्षात घेता राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते, पदाधिकारी सोईच्या पक्षात दाखल होत आहेत. राज्यभरातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काही ठिकाणी तर सत्ताधारी पक्षांनाही धक्का बसला आहे. असे असतानाच आता भाजपाला मोठा धक्का बसला आहे. एका बड्या आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने भाजपाची साथ सोडली आहे. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना ही माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात या राजीनाम्याची चर्चा होत आहे.
माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोयमिळालेल्या माहितीनुसार भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपले राजीनामापत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले आहे. “गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यामुळे आपल्या पार्टीची प्रतिमा मलीन होऊ शकते,” असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मी सदैव भारतीय जनता पक्षासोबत आहेमोरे यांनी पुढे नमूद केले आहे की, “माझे आई-वडील, माझे कुटुंब आणि मी गेली ४० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे आणि अविरत करत आहोत. बुथ अध्यक्ष ते भाजयुमो प्रदेशाध्यक्ष या प्रवासात पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला. आमचा परिवार आणि मी सदैव भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि राहू.” असेही मोरे यांनी म्हटले आहे.
भाजपा कोणाला संधी देणार?“भारतीय जनता पक्षाची माझ्यामुळे प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेत आहे. मी सदैव ‘प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी, नंतर स्वतः’ या तत्वावर निष्ठेने कार्य करत राहीन,” असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. दरम्यान त्यांच्या या अचानक राजीनाम्यामुळे युवा मोर्चा संघटनेत मोठी उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोरे यांच्यावर पक्षाने काही जबाबदारी टाकली असती आता भाजपाला मोरे यांच्या जागेवर पर्यायी आणि सक्षम चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता मोरे यांची जागा नेमकं कोण घेणार? भविष्यात मोरे काही वेगळा विचार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.