 
            पिंपरी, ता. ३० : ‘बीएच’ (भारत क्रमांक) नोंदणी असलेल्या वाहनांसाठी कर वैधता दोन वर्षे असते. त्यानंतर कर भरावा लागतो. तो न भरल्यास वैध कालावधीपासून ७ दिवसानंतर प्रतिदिन १०० रुपये इतके अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. बऱ्याच वाहन चालकांना ही माहिती नसल्यामुळे अतिरिक्त शुल्काची रक्कम काही हजारांवर जात आहे. त्यामुळे त्यांना भुर्दंड सहन करावा लागतो. 
मोटर वाहन अधिनियम, १९८८, कलम ४७ अंतर्गत वाहनांची नोंदणी बंधनकारक असते. वाहनांसाठी प्रत्येक राज्यात क्रमांक मालिका वेगवेगळी आहे. महाराष्ट्रात ‘एमएच’ मालिका आहे. एखादे वाहन दुसऱ्या राज्यात वाहन नोंदणी हस्तांतराशिवाय फक्त १२ महिने चालवू शकतात. त्यानंतर वाहन त्याच राज्यात चालवायचे झाल्यास संबंधित राज्यात नोंदणी आवश्यक असते. पुनर्नोंदणी न केल्यास वाहनचालकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते. 
प्रामुख्याने खासगी किंवा शासकीय कर्मचारी, ज्यांच्या नोकऱ्या सतत बदलत असतात अशांसाठी हा नियम त्रासदायक होता. ही गैरसोय टाळण्यासाठी आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहनांची नोंदणी हस्तांतरित (व्हेहिकल रजिस्ट्रेशन ट्रान्सफर) करण्याचे टाळण्यासाठी १५ सप्टेंबर २०२१ रोजी रस्ते वाहतूक मंत्रालयाने ‘भारत क्रमांक’ (बीएच) सिरीज सुरू केली होती. ‘बीएच नंबर’ सिरीज असेल, तर त्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज लागत नाही. 
या निर्णयानंतर अनेकांनी वाहनांसाठी ‘बीएच’ क्रमांक घेतले. यात वाहनांची नोंदणी केल्यानंतर वाहनांच्या किंमतीनुसार कर आकारला जातो. याची वैधता दोन वर्षे असते. त्या कालावधीचा कर भरावा लागतो. तो न भरल्यास वैधता कालावधीपासून ७ दिवसानंतर प्रतिदिन १०० रुपये इतके अतिरिक्त शुल्क आकारले जाते. एक वर्षे कर न भरल्यास दंडाची रक्कमच थेट ३६ हजार रुपये होते.
कोणाला घेता येतो हा नंबर?
राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचारी, प्रशासकीय सेवा कर्मचारी, संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि चारपेक्षा जास्त राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांचे कर्मचारी यांना हा नंबर घेता येतो. तसेच राज्य सरकार, केंद्र सरकार, संरक्षण, खासगी संस्थेसंबंधी जोडलेले कर्मचाऱ्यांना घेता येतो.
कोणत्या वाहनांना किती कर (टक्के)
वाहन प्रकार - इलेक्ट्रिक - पेट्रोल - डीझेल 
१० लाखांपर्यंतचे वाहन - ६- ८ - १० 
१० ते २० लाखांपर्यंतचे वाहन - ८- १० - १२ 
२० लाखांपेक्षा जास्त किंमतीचे वाहन १० - १२ - १४ 
‘बीएच’ मालिकेतील वाहनांसाठी दोन वर्षांसाठी कर घेतला जातो. त्यानंतरच्या सात दिवसानंतर प्रतिदिन १०० रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे ‘बीएच’ मालिकेमध्ये नोंदणीकृत असलेल्या वाहनांचा कर वेळेत भरून वाहन मालकांनी अतिरिक्त शुल्क टाळावे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड