 
            लोणावळा, ता. ३० : जल योग क्षेत्रात नवा इतिहास घडविण्याचा संकल्प रमेश व्यास यांनी केला आहे. पाण्यात योगासन साधून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा त्यांचा मानस आहे. 
योग केवळ भूमीवरच नाही तर पाण्यातही साध्य होऊ शकतो. त्यांच्या निवासस्थानी असलेल्या तलावात व्यास मागील २५ वर्षे योगाभ्यास करत आहेत. गुरुदेव देवमुनि व स्वामी महेशानंद यांच्या प्रेरणेने त्यांनी योगविद्येवर नवीन प्रयोग केले. या साधनेच्या माध्यमातून पाण्यावर पद्मासन, शिर्षासन, ध्यानस्थिती, जलातील सूर्यनमस्कार, तसेच प्राणायाम यांसारखी अनेक आसने ते साकारतात. एक तासाहून अधिक काळ पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत ध्यानधारणा करू शकतात. 
जास्तीत जास्त वेळ पाण्यात राहून योगाची प्रात्यक्षिक करत व्यास यांच्या साधनेची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या उपक्रमाद्वारे जल संरक्षण, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक संतुलनाचा संदेश देण्याचा उद्देश असल्याचे व्यास म्हणाले.