 
            टीम इंडियाने अवघ्या काही आठवड्यांपूर्वी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा फायनलमध्ये धुव्वा उडवत टी 20i आशिया कप 2025 ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. मात्र तेव्हापासून भारताला आशिया कप ट्रॉफी देण्यात आलेली नाही. एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी भारताला ट्रॉफी दिलेली नाही. त्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. अशात आता क्रिकेट वर्तुळातून मोठी अपडेट समोर आली आहे. पुन्हा एकदा हे 2 कट्ट्रर प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय.
एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेने रायजिंग स्टार्स टी 20 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. एसीसीने शुक्रवारी 31 ऑक्टोबरला सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली. या स्पर्धेचा थरार 14 ते 23 नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. स्पर्धेचं आयोजन हे कतारची राजधानी दोहा येथे करण्यात आलं आहे. स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 प्रमाणे 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 3-3 सामने खेळणार आहे. अव्वल 4 संघ उपांत्य फेरीत पोहचतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील विजयी संघ फायनलमध्ये ट्रॉफीसाठी भिडतील.
टीम इंडिया ए, पाकिस्तान ए, यूएई ए आणि ओमान ए यांचा बी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर ए ग्रुपमध्ये बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचा समावेश आहे.
या स्पर्धेत 14 ते 19 नोव्हेंबर सलग 6 दिवस डबल हेडरचा थरार रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणीच असणार आहे.
या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. चाहत्यांना या सामन्याचे आतापासूनच वेध लागले आहेत. हा सामना रविवारी 16 नोव्हंबरला होणार आहे.
या स्पर्धेचं नाव बदलण्यात आलं आहे. एसीसी एमर्जिंग आशिया कप स्पर्धेचं नाव बदलून आता रायजिंग स्टार्स टी 20 टुर्नामेंट असं ठेवण्यात आलं आहे.
संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक
दरम्यान या स्पर्धेची सुरुवात 2013 साली करण्यात आली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण 6 हंगाम झाले आहेत. या स्पर्धेची सुरुवात ही अंडर 23 पासून करण्यात आली. त्यानंतर या स्पर्धेत मुख्य संघाची ए टीम सहभाग घेऊ लागली. पाकिस्तान आणि श्रीलंकेने प्रत्येकी 2-2 वेळा विजेतेपद मिळवलं आहे. तर अफगाणिस्तान आणि टीम इंडियाने प्रत्येकी 1 वेळा या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. या स्पर्धेच्या शेवटच्या हंगामात अफगाणिस्तानने श्रीलंकेवर अंतिम फेरीत मात केली होती.