रावेत, ता.२ ः रावेत परिसरातील मुख्य चौकांमध्ये रावेत चौक, पंपिंग स्टेशन आणि भोंडवे चौक येथे अतिक्रमणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फेरीवाले, बेकायदेशीर पार्किंग आणि अर्धवट उभारलेले बांधकाम यामुळे वाहतुकीचा खोळंबा तर होत आहेच. पण त्याबरोबर नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही गंभीर परिणाम होत आहे.
रावेत चौक परिसरात संध्याकाळच्या सुमारास वाहनांची मोठी गर्दी होते. रस्त्यांवर फेरीवाल्यांचे तंबू, खाद्य पदार्थांचे स्टॉल आणि अनधिकृत पार्किंगमुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले आहे. पंपिंग स्टेशन परिसरात देखील अतिक्रमणांमुळे पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम अडचणीत येत असते. भोंडवे चौकात रस्त्याच्या कडेला विक्रेत्यांनी आपली दुकाने व मालाचे ठेले लावल्याने वाहतूक कोंडी ही रोजची बाब झाली आहे. नगरपालिका प्रशासनाकडून यावर ठोस कारवाई होणे अपेक्षित आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार लेखी तक्रारी दिल्यानंतरही अद्याप अतिक्रमणविरोधी पथकाने मोठी मोहीम हाती घेतलेली नाही.
रावेत परिसर झपाट्याने विकसित होत आहे. परंतु, अतिक्रमणांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी ऑफिसला किंवा शाळेत जाताना वाहतुकीतून वाट काढणे हे रोजचेच संकट झाले आहे.
- प्रदीप शिंदे, नागरिक
पदपथावर फेरीवाले बसल्याने महिला आणि मुलांना चालणे कठीण झाले आहे. रात्रीच्यावेळी गर्दीतून जाणे धोकादायक वाटते.
- स्वाती कदम, नागरिक