India Champion : दक्षिण अफ्रिकन कर्णधार लॉराचा पराभवानंतर मोठा खुलासा, 21 वर्षीय खेळाडूमुळे हरलो
GH News November 03, 2025 09:11 PM

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी झुंज दिली. पण विजयासाठी दिलेल्या 298 धावांचा पाठलाग करताना संघ 246 धावांवरच बाद झाला. भारताने या सामन्यात 52 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वार्डने झुंजार खेळी केली. ती मैदानात असेपर्यंत भारताला विजय मिळेल की नाही याची धाकधूक होती. तिची विकेट पडली आणि भारताचा विजय निश्चित झाला. या पराभवानंतर दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वार्ड निराश झाली. या पराभवासाठी तिने 21 वर्षीय क्रिकेटपटू शफाली वर्माला जबाबदार धरलं. शफाली वर्माने गोलंदाजी करत दोन विकेट घेतल्या आणि त्यामुळे संघाची पिछेहाट झाल्याचं सांगितलं. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार लॉरा वॉल्वार्डने याबाबतचा खुलासा केला.

लॉरा वॉल्वार्ड म्हणाली की, ‘मला अपेक्षितच नव्हतं की शफाली आज अधिक गोलंदाजी करेल. त्यामुळे तिची गोलंदाजी पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. तिने विकेट टू विकेट आणि खूपच संथ गोलंदाजी केली. त्यामुळे तिला दोन विकेट मिळाल्या. वर्ल्डकप अंतिम फेरीच्या सामन्यात तुम्ही पार्ट टाइम गोलंदाजाला विकेट देऊ इच्छित नाही. पण आम्ही दोन विकेट दिला, हे खूपच निराशाजनक आहे. तिच्या गोलंदाजीमुळेच आमची सामन्यात पिछेहाट झाली. शेवटी आम्हाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.’ शफाली वर्माने दक्षिण अफ्रिकेच्या सुने लुस आणि मारिझेन कॅपची विकेट काढली. यापूर्वी शफालीने पूर्ण वनडे करिअरमध्ये फक्त 14 षटकं टाकली होती.

हरमनप्रीत कौरने सामन्यानंतर सांगितलं की, लॉरा वॉल्वार्ड आणि सुने लुस चांगली फलंदाजी करत होते. मी शफालीला पाहीलं. तिने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती ते पाहून मला वाटलं की आज तिचा दिवस आहे. ती काहीतरी विशेष करत होती आणि मी अंतर्मानाचा आवाज ऐकला आणि तिला कमीत कमी एक षटक द्यायला हवं. मी तिला विचारलं की तू एक षटक टाकू शकते. ती यासाठी पूर्णपणे तयार होती. तिने होकार दिला आणि हाच टर्निग पॉइंट ठरला. याचं श्रेय शफालीला जातं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.