मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी
जोगेश्वरी, ता. २ (बातमीदार) ः अंधेरी पूर्व परिसरातील नगरदास रोडवरील गोवर्धनदास हवेली येथील जैन मंदिराजवळ दररोज सकाळी व संध्याकाळी मोकाट गायींचा त्रास वाढत चालला आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांकडून चारा मिळावा, यासाठी एक गवळी भाड्याने गायी येथे आणून आपला उदरनिर्वाह करत आहे.
या गायी विशिष्ट वेळी रस्त्यावर मोकाट सोडण्यात येतात. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. सकाळी कामावर जाणाऱ्या आणि संध्याकाळी घरी परतणाऱ्या नागरिकांना या गायी रस्त्याच्या मधोमध उभ्या किंवा बसलेल्या अवस्थेत आढळतात. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा आणि गायी अंगावर येण्याचा धोका सतत जाणवतो.
फक्त एवढेच नव्हे, तर या मोकाट गायींमुळे रस्त्यावर मलमूत्र साचल्याने परिसर अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त झाला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावरच पालिकेचे के-पूर्व कार्यालय आहे. अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. या समस्येकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे.