अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांची पूर्वपत्ती तसेच अब्जाधीश समाजसेविका मॅकेंझी स्कॉट नेहमीच आपल्या उदारतेमुळे ओळखल्या जातात. त्यांनी समाजसेवेसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये दान केलेले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी चक्क 310 कोटी रुपये दान करून जगापुढे एक नवे उदाहरण ठेवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी गरजुंना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी हे पैसे थेट दान करून टाकले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे जगभरातून कौतुक केले जात आहे.
कुठे वापरले जाणार दान केलेले पैसेमॅकेंझी स्कॉ्ट यांची Yield Giving नावाची एक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्या समाजसेवेची कामे करतात. त्यांनी याच संस्थेअंतर्गत अमेरिकेतील सॅन राफेल येथील 10,000 Degrees नावाच्या संस्थेला हे 310 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. 10,000 Degrees ही संस्था न नफा न तोटा या तत्त्वावर करते. पहिल्यांदाच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना या संस्थेकडून आर्थिक मदत केली जाते. विशेषत: कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ही संस्था काम करते. फॉर्च्यूनच्या रिपोर्टनुसार मॅकेंझी यांनी दान केलेले 310 कोटी रुपये हे 10,000 Degrees या संस्थेला मिळालेली आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे.
प्रिन्स्टन विद्यापीठातून पदवीमॅकेंझी स्कॉट फक्त समाजसेवेचेच काम करतात असे नाही. त्या एक प्रसिद्ध अशा लेखिका आहेत. कॅलिफोर्नियात 1970 साली त्यांचा जन्म झाला. त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदवीचे शिक्षण घेतले. नोबेल पारितोषक विजेत्या लेखिका टोनी मॉरिसन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी जेफ बेझोस यांच्यासोबत अॅमेझॉन या कंपनीची सुरुवात केली होती.
कुटुंब आणि लिखाणाकडे दिले लक्षसुरुवातीच्या काळात मॅकेंझी कंपनीचे धोरण, शिपिंग, अकांट्स अशा वेग वेगवेगळ्या कामांमध्ये सहभाग नोंदवायच्या. पुढे मात्र त्यांनी कुटुंब आणि लिखाणावर आपले लक्ष केंद्रित केले. त्यांची The Testing of Luther Albright (2005) आणि Traps (2013) नावाची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. यातील पहिल्या पुस्तकाला American Book Award हा प्रतिष्ठित पुरस्कारही मिळालेला आहे.
मॅकेंझी या आपल्या दानशुरतेमुळे ओळखल्या जातात. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांचे दान करताना त्या कोणतीही अट ठेवत नाहीत. त्यामुळे संबंधिस संस्थेला सोईनुसार निर्णय घेण्यास संधी मिळते. त्यांची दानशुरता आता अनेकांसाठी एक प्रेरणा ठरत असून अनेक लोक अशाच प्रकारे दान करण्यासाठी पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.