वाशी सोसायटीतील गैरव्यवहार उघड
माजी पदाधिकारी दोषी, ९५ लाखांच्या वसुलीचे आदेश
नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : वाशी सेक्टर ३० ए येथील फॅन्टसिया बिझनेस पार्क प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड संस्थेत आर्थिक अनियमितता आढळली होती. या प्रकरणात ११ माजी समिती सदस्य जबाबदार धरताना ९५.७५ लाखांची वसुलीचे आदेश दिले आहेत.
फॅन्टसिया बिझनेस पार्क प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना संस्थेच्या कारभारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याची तक्रार सदस्यांनी सिडको उपनिबंधक कार्यालयात केली होती. त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ अंतर्गत चौकशी करण्यात आली होती. प्राधिकृत अधिकारी म्हणून दीपक खांडेकर यांनी संस्थेतील आर्थिक अनियमिततेबाबत चौकशी केली. या अहवालात संस्थेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी ११ माजी समिती सदस्यांवर निश्चित करण्यात आली आहे.
-------------------------
वनमंत्र्यांकडे तक्रार
वाशी फॅन्टसिया बिझनेस पार्कमधील सभासदांनी वनमंत्री गणेश नाईक यांची वाशी येथे झालेल्या जनता दरबारात भेट घेतली होती. या वेळी सोसायटीचे माजी अध्यक्ष किरण पैलवान व सचिव श्रीकांत पत्कीवर गुन्हा दाखल करून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली. त्या वेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात उपस्थित असलेल्या उपनिबंधक प्रताप पाटील यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले होते.