मुरबाडच्या धसई येथे शेतीत आधुनिक क्रांती
जिल्ह्यातील ‘कम्बाइन हार्वेस्टर’चा पहिला प्रयोग यशस्वी
सुधाकर वाघ ः सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता. २ : देशातील पहिले कॅशलेस गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरबाड तालुक्यातील धसई येथील प्रगतिशील शेतकरी अरविंद घोलप यांनी शेतीत आधुनिक क्रांती केली आहे. उत्पादन क्षमता वाढवणे आणि श्रम खर्च कमी करणे या उद्दिष्टाने त्यांनी तब्बल २२ लाख किमतीचा आधुनिक ‘कम्बाइन हार्वेस्टर’ खरेदी करून ठाणे जिल्ह्यातील पहिला यशस्वी प्रयोग राबवला आहे. यासाठी त्यांना शासनाच्या कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत सुमारे ५० टक्के अनुदान मिळणार आहे.
‘कम्बाइन हार्वेस्टर’ हे एक अत्याधुनिक शेती यंत्र असून, ते कापणी, मळणी आणि धान्य स्वच्छता ही तिन्ही कामे एकाच वेळी पार पाडते. पारंपरिक पद्धतीत या कामांसाठी वेगवेगळे मजूर, साधने आणि मोठा वेळ लागतो, मात्र या यंत्रामुळे श्रम, वेळ आणि खर्च या तिन्हींची मोठ्या प्रमाणात बचत होते. हे यंत्र भात, गहू, ज्वारी अशा विविध पिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या आधुनिक यंत्राची प्रत्यक्ष पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे रामेश्वर पाचे आणि मुरबाड तालुका कृषी अधिकारी संदीप केणे यांनी धसई येथे केली. अधिकाऱ्यांनी शेतकरी अरविंद घोलप यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. घोलप यांच्या पुढाकारामुळे धसई परिसरात शेती क्षेत्रात नवीन तांत्रिक क्रांतीची सुरुवात झाली आहे. या यंत्रामुळे कापणीचा कालावधी कमी होईल, पीक नुकसान घटेल आणि दर्जेदार धान्य उपलब्ध होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
‘कम्बाइन हार्वेस्टर’चे शेतीतील फायदे
हा यशस्वी प्रयोग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, यामुळे मजुरीचा खर्च कमी येतो. तसेच कामे कमी वेळेत पूर्ण होतात. मजूर टंचाईची अडचण कमी होते. तसेच पावसामुळे होणारे नुकसान टळते. श्रम व वेळ दोन्हीची बचत होते. उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मदत होते. पुढील शेतीचे नियोजन वेळेत करता येते.
ठाणे जिल्ह्यातील हा पहिला कम्बाइन हार्वेस्टर प्रयोग असून, आधुनिक शेतीचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे उत्पादन वाढते आणि शेती अधिक फायदेशीर होते.
- रामेश्वर पाचे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे
शेतीच्या कामासाठी दरवर्षी मजुरांची कमतरता आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे कापणीची वेळ चुकत होती. त्यामुळे मी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या अनुदानाची मदत मला मिळणार आहे. परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही आता या यंत्राचा फायदा होणार आहे.
- अरविंद घोलप, शेतकरी