Nashik News : जगभरातील नाण्यांचा खजिना नाशिकला! डॉ. सुनीता पाठक यांची मविप्रच्या संग्रहालयाला अनमोल भेट
esakal November 03, 2025 11:45 PM

नाशिक: ‘चीनी युआन’ ते ‘इंडोनेशियन रुपिया’ आणि युरोप खंडातील ‘युके पौंड स्टर्लिंग’ ते ‘फिनलंडचे युरो’. अशा २५ ते ३० देशांमधील तब्बल २७५ प्रकारच्या चलनी नाण्यांचा खजिना मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयास मिळाला. अनेक देशांमध्ये अध्यापन आणि संशोधन करताना संकलित केलेली नाणी प्रा. डॉ. सुनीता पाठक यांनी भेट स्वरूपात दिली.

प्राध्यापिका असताना डॉ. सुनीता पाठक यांना आशिया आणि युरोप खंडातील अनेक देशांमध्ये अध्यापन व संशोधनाचे कार्य करण्याची संधी मिळाली. या देशांमधील भेटी कायमस्वरूपी स्मरणात राहाव्यात, यासाठी तेथून त्या-त्या देशांची नाणी सोबत घेऊन त्या परतत असतं. अनेक वर्षांपासून जिवापाड जपलेला हा अनमोल खजिना शैक्षणिक संग्रहालयामध्ये ठेवल्यास त्यांचा वापर अधिक चांगल्या रीतीने होईल.

भावी तरुण पिढीला परकीय चलनांची ओळख होईल, चलनांचा इतिहास जाणून घेण्याची प्रेरणा निर्माण होईल, या उद्देशाने सर्व २७५ नाणी डॉ.पाठक यांनी मविप्रच्या उदाजी महाराज शैक्षणिक संग्रहालयास सुपूर्द केली.

मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संग्रहालयाचे शिक्षणाधिकारी प्रा. शशिकांत मोगल, आयएमआरटी महाविद्यालयाचे संचालक प्रशांत सूर्यवंशी, ए. के. पवार, डॉ. अनिल पाठक, संग्रहालयाच्या प्रशासक स्वाती वाडेकर आदी उपस्थित होते.

अशी आहेत नाणी..

ऑस्ट्रेलियन, हाँगकाँग, न्यूझीलंड, सिंगापूर, तैवान, अमेरिकन, कॅनेडियन, ब्रुनेई - डॉलर्स, चिनी-युआन, थाई- बाहत, मलेशियन-रिंग इट, फिलिपिन्स- पेसो, स्विस-फ्रँक, फ्रेंच- फ्रँक, इटालियन-लिरा, यूके-सेंटस, व्हिएतनाम-डोंग, जर्मनी- मार्क, रिपब्लिक-कोरुना इंडोनेशियन- रुपिहा आदी.

Thane Metro: मेट्रोच्या भुयारी मार्गात अडथळ्यांचे आव्हान! काम कधी सुरू होणार?

उदाजी महाराजांच्या नावाने उभारलेल्या शैक्षणिक वारसा संग्रहालयाला प्राध्यापिका डॉ. सुनीता पाठक यांनी दिलेली भेट निश्चित भावीपिढीसाठी प्रेरक ठरेल. ज्या भावनेतून त्यांनी ही अनमोल भेट दिली, ती भावना आणि तो विश्वास नक्कीच जपला जाईल. नाशिककरांनी या संग्रहालयाला भेट देत सुवर्ण इतिहास जाणून घ्यावा.

- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.