Toll Tax : स्कूटर आणि बाईकला टोल का लागत नाही? अनेकांना हे कारण माहितीच नाही
GH News November 05, 2025 06:16 PM

Toll Tax on Two Wheelers : देशात दुचाकी वाहनांना टोल द्यावा लागत नाही. पण असे का, याचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का? कार, बस, चारचाकी वाहनांना, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल टॅक्स द्यावा लागतो. तर बाईक आणि स्कूटरला टोल नाक्यावरील रांगेत उभं राहावं लागत नाही. त्यांच्यासाठी वेगळी मार्गिका असते. तिथे आडकाठीविना ते टोल नाक्यावरून बाहेर पडू शकतात. टोल नाक्यावर दुचाकी वाहनांना कर का लागत नाही, काय आहे नियम, जाणून घ्या.

राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम काय सांगतो?

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग शुल्क नियम (National Highways Fee Rules) 2008 च्या नियम 4(4) नुसार तीन चाकी आणि दुचाकी वाहनांना टोल करातून पूर्णपणे सूट, सवलत देण्यात आली आहे. या नियमानुसार, राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वाहनांना टोल द्यावा लागत नाही. असा टोल आकारला गेला तर मध्यमवर्गीय कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक ताण येईल. दुचाकी वाहनं बहुतेक ही मध्यमवर्गीय कुटुंबाकडे असतात. बाईक आणि स्कूटर कोणत्याही मध्यम कुटुंबाचे दळणवळणाचे किफायतशीर साधन आहे. अशावेळी त्याच्यावर टोल टॅक्स लावला तर मध्यमवर्गात सरकारविरोधात नाराजी पसरेल. त्यामुळे ही तरतूद करण्यात आली आहे.

टोल का आकारण्यात येतो?

उत्तम सुविधा, रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती आणि पुनर्निमाण यासाठी टोल आकारल्या जातो. टोल रक्कमेतून रस्ता दुरुस्ती होते. राष्ट्रीय महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांकडून टोल आकारल्या जातो. हलक्या आणि लहान वाहनांमुळे रस्त्यांची मोठी घसाई होत नाही. रस्त्याचे मोठे नुकसान होत नाही. तर जड आणि अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दुरुवस्था होते. त्यांच्या वापरामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान होते.

वाहन कर अगोदरच जमा

अजून एक विशेष बाब म्हणजे जेव्हा आपण बाईक अथवा स्कूटर खरेदी करतो. तेव्हाच वाहनाच्या किंमतीत रस्त्यासाठीच्या कराचा आगाऊ समावेश असतो. वाहन मालक जेव्हा वाहनाची नोंदणी करतो. त्याचवेळी त्याने रस्त्यासाठीचा कर भरलेला असतो. हा कर अप्रत्यक्ष स्वरुपाचा असतो. तो सार्वजनिक रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गाचा वापरण्याचा खर्च अगोदरच वसूल करतो. त्यामुळे या छोट्या वाहनांवरील कर अगोदरच जमा असल्याने दुचाकी वाहनांवर टोल आकारल्या जात नाही हे पण एक कारण आहे. अप्रत्यक्षरित्या त्या कराचा भरणा वाहनधारकाने अगोदरच केलेला असतो.

अजून एक मुद्दा म्हणजे दुचाकीवर जर टोल आकारण्याचे ठरवले तर मग दुचाकीच्या लांबच लांब रांगा टोल नाक्यावर दिसतील. इतर चारचाकी वाहतुकीवरही त्याचा परिणाम होईल. बेशिस्त वाढेल. इतक्या वेळी टोल नाक्यावर थांबण्याची मानसिकता वाहनधारकांची नसते. त्यामुळे मोठा गोंधळ उडण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. हे पाहता दुचाकी वाहनांना टोल नाक्यावर कर आकारला जात नाही. विशेष समृद्धी, कोस्टल आणि इतर महामार्गांवर दुचाकींना प्रवेशच नसल्याने अशा ठिकाणी दुचाकी वाहनधारकांना प्रवास करता येत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.